...तर गावात प्रचार बंदी करू ; ग्रामस्थ आक्रमक

सरुंदेवाडीवासियांची पुलाअभावी परवड
Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 11:34 AM
views 263  views

सावंतवाडी : 21 व्या शतकात जग चंद्रावर पोहचलो, डिजिटल आणि टेक्नॉलॉजिच्या मोठं मोठ्या गप्पा होत असताना सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कुणकेरी गावातील सरुंदेवाडी आजही रस्ता जोडणारा पूल नसल्याने दुर्लक्षित राहिली आहे. विकासाच्या मुख्य घटकापैकी दळणवळणच्या सुविधेपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित असल्याने रोजच्या जगण्यासाठी त्यांना धडपडावे लागत आहे.

सरुंदेवाडी हा भाग पाळणेकोंड धरणक्षेत्राच्या खालच्या बाजूला येतो. त्याच ठिकाणी प्रसिध्द असे श्री देव उपरलकर  देवस्थान आहे या ठिकाणी भाविक कायमच ये जा करीत असतात. पाळणेकोंड धरणाच्या सांडव्यातून पडणारे पाणी याच ओहळतून पुढे जाते. पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यावर गोडबोले गेट उघडल्यावर अचानक या ओहळला पूर येतो. ओहळाच्या पलीकडच्या माणिकचौक, भवानीवाडी, परबवाडी या वाडीतील ग्रामस्थांची शेती व बागायती ही तिकडे असल्याने त्यांना कायम या ओहळातून ये- जा करावी लागते. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न मिळता अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळ्यात या ओहळला कायम पाणी हे धोकादायक पातळीवर असल्याने वाडीचा गावाशी संपर्क तुटला जातो. अश्यावेळी कोणाची तब्बेत खालवली तर त्याला वैद्यकीय सुविधा मिळणे खुप अवघड असते. तसेच संबंधिताला उचलून पलीकडे आणावे लागते. सध्या या वाडीतील 60% ग्रामस्थांचे वय हे 65 वर्षाच्या पलीकडे असल्याने त्यांना कायम डॉक्टर व औषधोपचारावर अवलंबून राहावं लागते. अश्यावेळी पावसाळ्यात त्यांना अत्यावश्यक सुविधा मिळू शकत नसल्याने जीवन हे रामभरोसे झालेले आहे. अनेक अडचणींचा सामना करत येथील ग्रामस्थ खडतर जीवन जगत आहेत. 

मागील 20 वर्षांपासून या पुलासंदर्भात वेगवेगळ्या पक्षाच्या पुढऱ्यांना निवेदन दिली गेली तसेच बऱ्याच पुढऱ्यांनी आश्वासाने दिली पण आजही प्रत्यक्षात तिथली परिस्थिती जैसे थे आहे. विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याकडे वारंवार याचा पाठपुरावा केला गेला. पण आज 20 वर्षे झाली फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले गेले हे पूल व्हावे अशी सर्व कुणकेरीवासिय ग्रामस्थ तसेच राजकीय पदाधिकारी यांची  इच्छा आहे. परंतु आजही शासन दरबारी याची नोंद घेतली घेतली जात नाही. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे तत्पूर्वी जर पुलाचा प्रश्न निकाली न काढल्यास ग्रामस्थांकडून भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसेच सर्वच राजकीय पुढऱ्यांना ग्रामस्थ प्रचार बंदी करतील असे मत सामाजिक कार्यकर्ते  मनोज घाटकर व पिडीत ग्रामस्थ यांनी व्यक्त केले आहे.