
सावंतवाडी : बाजारपेठेतील व्यापारी वर्गानं सावंतवाडी नगरपरिषदेत धडक दिली. यावेळी निकृष्ट दर्जाचं काम केलेल्या बाजारपेठील रस्त्यावरील खडी भरुन नेण्याबाबतची मागणी त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला केली. या खडीमुळे अपघात होत असून लोक जखमी होत आहेत. यासह दुकानात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. दोन दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास रस्त्यावरची खडी उचलून नगरपरिषदेच्या दारात ओतणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या क्षेत्रात जून महिन्यात रस्त्याचे काम झाले होते. सावंतवाडी मिलाग्रीस स्कूल ते गांधी चौक मेनरोड दरम्यान करण्यात आलेले रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे हा रस्ता पावसामुळे वाहून जावून रस्त्यावर खडी शिल्लक आहे. या खडीमुळे कालच एक विद्यर्थी व पालक अपघातामुळे गंभीर जखमी झाले असून त्या खडीचा व धुळीचा सर्व व्यापाऱ्यांना व नागरिकांना त्रास होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती ही चुकीच्या पध्दतीने झालेली असताना प्रशासनानं हा विषय गांर्भियाने घेतला नव्हता. त्यामुळे आता नागरिकांना वाढत चाललेला त्रास गांर्भियाने घेवून आपली जबाबदारी म्हणून रस्त्यावरील खडी भरुन न्यावी व रस्ता साफ करावा. तसे न केल्यास आम्ही व्यापारी वर्ग आंदोलन करु व त्याला जबाबदार नगरपरिषद राहील असा इशारा व्यापारी वर्गान दिला. यावेळी व्यापारी प्रतिक बांदेकर, गितेश पोकळे, राणा रायका, गुरूप्रसाद चिटणीस, संतोष म्हापसेकर, अल्फाज मुल्ला, विठ्ठल बांदेकर, संदेश सावंत आदी व्यापारी वर्ग उपस्थित होते.