..तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूस 'बॅन' होण्याची भीती !

'मराठी बाणाचे लेखक, दिग्दर्शक तथा मुंबईतील आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी आंबा उत्पादकांना केलं सावध !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 15, 2022 18:41 PM
views 332  views

देवगड : हापूस आंबा व्यवसायावर तुडतुडे, थ्रीप्स, बुरशी, मिलिबग आणि फळमाशी अशी संकटे उभी आहेत. फळमाशी हा आजमितीला सर्वात मोठा शत्रू असून त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूस 'बॅन' ( बहिष्कृत) होण्याची भीती आहे. या संकटावर मात करण्यासाठी बागायतदारांनी त्वरित पावलं उचलली पाहिजेत, असे प्रतिपादन 'मराठी बाणाचे लेखक, दिग्दर्शक तथा मुंबईतील आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी केले.


येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर देवगड तालुका आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. अजित गोगटे, प्रगतशील आंबा बागायतदार विद्याधर जोशी, संदीप कुलकर्णी उपस्थित होते. अशोक हांडे यांनी शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा, पॅकिंग, ग्रेडिंग, सॉर्टींगबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. फळमाशीवर उपाय करायचा असेल, तर तो सगळ्यांनी विचाराने आणि मनाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आंब्याचा दर आणि खर्च यातील तफावत कमी करण्यासाठी अगदी छोटे- छोटे प्रयत्न करून खर्च जास्तीत जास्त कमी करावा. अतिशिघ्र नाशिवंत या प्रकारात आंबा मोडत असल्याने त्यास हमीभाव मिळणे शक्य होत नाही. पण सरकार तशी हमी पातळी ठरवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊ शकते. कोकणातील शेतकऱ्यांची ऐकीच शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेईल, असेही हांडे म्हणाले. यावेळी त्यांनी फळमाशीवर मुंबईतील निर्यातदारांनी काय प्रयत्न केले, याची माहिती दिली.


शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन


फळमाशीबाबत विविध उपाययोजनांबाबत श्री. जोशी, अॅड. गोगटे, श्री. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. श्री. जोशी यांनी शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला दिला. अॅड. गोगटे यांनी शेतकरी हिताच्या सरकारी योजनांविषयीची माहिती दिली. तर श्री. कुलकर्णी यांनी खत, कीटकनाशकांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रमोद पाटणकर, शैलेश बोंडाळे, श्री. वेलणकर, श्री. रावजी, राजेश वाळके, उमेश वाळके, ना. र. मोरे, श्री. कदम, श्रीरंग भिडे, दामू मिराशी, प्रसाद सत्यवान तांबे, राहुल गोगटे, प -भाकर पेडणेकर, प्रकाश डामरी, सागर गावकर आदी आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.