
सावंतवाडी : शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे रूग्ण वाढत आहेत. डासांमुळे नागरिकांची झोप उडालेली असताना नगरपरिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दोन दिवसात प्रभावी डास निर्मुलन मोहिम राबविण्यात यावी. अन्यथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्ती लावण्यात येतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांना सुखाची झोप मिळत नाही आहे. यातच डेंग्यू, मलेरिया सारखे रोग फोफावत आहेत. या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. गेली तीन वर्षे शहरात फवारणी करण्यात आली नाही आहे. लिक्विड टाकले गेले असेल तर त्याचा परिणाम मच्छरांवर होत नाही आहे. शहरात उघडी गटारे, सांडपाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे मच्छर अगरबत्ती शिवाय रात्री झोप लागणे कठीण झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी. येत्या दोन दिवसांत संपूर्ण शहरात डास निर्मुलन मोहिम राबविण्यात यावी. कर गोळा करण्यासाठी दारोदार फिरतात तसेच मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही डोअर टू डोअर फिरावे. दोन दिवसात मच्छरांपासून शहरवासियांची सुटका न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्त्या पेटवून प्रशासनाला जाग आणली जाईल असा गर्भित इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.