रानबांबुळी इथं बंद घरात चोरी...!

Edited by:
Published on: August 29, 2023 17:04 PM
views 314  views

सिंधुदुर्गनगरी : रानबांबुळी वायंगणकरवाडी येथील शामल आपकर यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी फ्रिज, वॉशिंग मशीन आणि पंचधातूच्या मुर्त्या असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रानबांबुळी वायंगणकरवाडी इथं शामल शशिकांत आपकर यांचे घर असून त्या सद्या मुंबई येथे राहत आहेत. १० ऑगस्ट २०२३ रोजी त्या मुंबई येथे गेल्या आहेत. दरम्यान १० ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या रानबांबुळी येथील घरात डल्ला मारला आहे. यात चोरट्यांनी ५ हजार रुपये किमतीच्या पाच पंचधातूच्या मुर्त्या, १५ हजार रुपये किमतीचा हायर कंपनीचा फ्रिज, १० हजार रुपये किमतीचा हायर कंपनीची वॉशिंग मशीन आणि २ हजार रुपये किमतीची भारत गॅस कंपनीची सिलिंडर टाकी असा मिळून एकूण ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबतची खबर रानबांबुळी सिमरेवाडी येथील भूषण भोगवेकर यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याचा विरोधात भादवी कलम ३८०, ४५७, ४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.