
दोडामार्ग मधील पहिल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला उदंड प्रतिसाद
दोडामार्ग : कलेतून व्यक्तिमत्त्व घडते तर, रंगभूमी कलाकाराला चतुरस्त्र बनवते. यासाठी गोव्याच्या धर्तीवर शालेय जीवनात महाराष्ट्रात सुध्दा नाट्यशास्त्र अभ्यासक्रम आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. तरच आजच्या नाट्य संमेलनाचे फलित होईल असे प्रतिपादन दोडामार्ग येथे आयोजीत पहिल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष वामन पंडित यांनी केले.
ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रकाश गवस यांच्या संकल्पनेतून व लोकनेते सुरेश दळवी यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी दोडामार्ग यांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील पहिले नाट्यसंमेलन राविवारी येथील विलास सभागृहात येथे संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुरेश दळवी, कार्यक्रमाच्या उदघाटक अर्चना घरे, प्रमुख पाहुणे अजय वैद्य, सतीश गवस, प्रकाश गवस, बाबूराव धुरी, रमकांत जाधव, गोविंद शिरोडकर, एस. टी. गवस, दयानंद धाऊसकर, चंद्रकांत मळीक, नगरसेविका संध्या प्रसादी, गणेश ठाकूर, ऍड. सोनू गवस, प्रा. संदीप गवस, उदय पास्ते आदी मान्यवर तसेच तालुक्यातील तमाम नाट्य कलाकार व प्रेमी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, सध्या आपण उद्यम काळात वावरत आहोत. माणसात पशुत्व आहे. हिंसक मार्ग हा कुठलीही गोस्ट नष्ट करण्याचा मोहात पाडतो. युद्ध व आणि कला ह्या विरुद्ध गोष्टी आहेत. परंतु, कला आणि शांती ह्या दोन्हीं गोष्टी एकरूप आहेत. कलाकारच शांती निर्माण करण्याचे काम करीत असतो. व्यक्तित्वा बरोबरच रंगभूमीवरील कलाकार चतुरस्त्र बनत बनतो. त्यामुळे हे बाळकडू लहान वयातच मुलांना पाजले पाहिजे. त्यासाठी शालेय शिक्षणात नाट्यशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात येणे तितकेच गरजेचे आहे. आज गोवा राज्यात नाट्यशास्त्र विषय शालेय जीवनातच शिकवीला जातो. महाराष्ट्रात जर अशा प्रकारचे शिक्षण दिले गेले तर, तळागाळात अनेक कलाकार घडतील. या करिता सर्वांनी राजकारण विरहीत व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येणे अत्यावश्यक असल्याचे वामन पंडित यांनी मनोगत व्यक्त केलं.
नाटकाचे बीज व मूळ गाभा संघर्षमय असला पाहिजे. त्रैलोक्यात इतकी चरित्रे आहेत. त्या नवरसांवर आधारित परिणामकारक नाटक देवाच्या सांगण्यावरून भारत मुनींनी लिहिले. त्यातूनच नाट्य कलेची निर्मिती झाली. नाट्य कला ही सहजासहजी मिळत नाही. विद्या देता येते पण, कला ही उचलावी लागते. ती लईसारखी सोबत घेऊन यावी लागते. नाटक हा जीवनाचा व समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. लेखक नाटकाला प्रतिकृती देतो, दिग्दर्शक आकृती देतो, नट हा कृती देतो, तंत्रन्य अलंकृत करतो व प्रेक्षक स्वीकृती देतो. नाटकाबद्दलच्या संकल्पना वेगळ्या आहेत. नाटक क्रिया शिकवीत नाही तर, नाटक प्रतिक्रिया शिकविते. नाट्यमय जीवनात तुम्हीं प्रतिक्रिया द्यायला शिकलात तरच आपले जीवनमान सुरळीत होईल. नाटक शिकायचे असेल तर पहिल्यांदा ते स्वतः समजून घेतले पाहिजे. त्यासाठी समूह महत्वाचा आहे. समूहामध्ये वागणे, एकमेकाला सहकार्य करणे हे नाटकातील महत्त्वाचे काम आहे. असे मार्गदर्शन डॉ, अजय वैद्य यांनी उपस्थित कलाकारांना केले.
या नाट्य संमेलनाची सुरुवात सिद्धिविनायक मंदिर येथून नाट्यदिंडीने झाली. पालखीत नटराज यांची मूर्ती ठेऊन पालखी दिंडी सोबत नेण्यात आली होती. या दिंडीत छोट्या कलाकारांनी कृष्ण, कर्ण, छत्रपती शिवाजी महाराज, हनुमान, आप्पासाहेब बेलवलकर, अर्जुन यासारख्या पुराणातील वेशभूषा धारण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव पाडगावकर यांनी केले. प्रस्ताविक प्रकाश गवस यांनी केले. आभार प्रा. संदीप गवस यांनी मानले.
गावच्या जत्रेतून अनेक कलाकार घडले - अजय वैद्य
खेडेगावात जत्रेत छोट्या पडद्यावर अनेक नाटके होत होती. मात्र, ती नाट्य परंपरा आता धूसर होत चालली आहे. त्या नाटकांकडे आता लोकांचा ओघ कमी होत आहे. जत्रेतील नाटकातून अनेक कलाकार घडले आहेत. आणि, तेच आता दिग्जज कलाकार म्हणून नावारूपाला आहे आहेत. त्यांनी जत्रेतील नाटकातच काम करून आपल्या कलेचा वारसा जोपासला आहे. नाटक म्हणजे नुसतं नाटक नाही. नाटकाला रंगरूप चढवायचा असेल तर चोख पाठांतर, शब्दफेक, वेगवेगळ्या जागा याची सांगड घातली तरच नाट्य प्रयोग यशस्वी होते. असे मत डॉ अजय वैद्य यांनी व्यक्त केले.
अविस्मरणीय संमेलन - सौ. घारे- परब
नाट्य संमेलनाचे उदघाटक अर्चना घारे म्हणाल्या की, प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमी नाट्य कलाकारांनी भरलेली समृद्ध भूमी आहे. येथील कलाकार कष्ट, भरपूर मेहनत व जीव ओतून काम करणारा आहे. परंतु, नाट्य कलेचे शालेय अभ्यासक्रमात शिक्षण दिले जात नाही. या कलेचे शिक्षण अभ्यासक्रमात सामाविष्ट केले पाहिजे. त्यासाठी लागणारे सर्वोत्तपरी सहकार्य मी करण्यास तयार आहे. आजचे हे तालुक्यातील पाहिले नाट्य संमेलन अविस्मरणीय आहे. दिलदार व्यक्तिमत्त्व असलेले सुरेश दळवी हे या नाट्य संमेलनाला लाभले त्यामुळे हे नाट्य संमेलन यशस्वी होऊ शकले अशा शब्दात सौ अर्चना घारे यांनाही मत व्यक्त केले.
कलाकारांच्या कौतूकासाठीच खटाटोप : प्रकाश गवस
दोडामार्ग तालुका खऱ्या अर्थाने कलाकारांची खाण आहे. अनेक कलाकार या मातीत तयार झालेत आणि रुळले आहेत. या अगोदर अनेक जणांनी नाट्य कलेसाठी आपले सर्वस्व लोटले होते. अनेक जणांनी आपली हयात हौशी नाट्य आणि रंगभूमीवर संपर्पित केली, अशाच कालाकांराच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी, त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी या नाट्य संमेलनाचा घाट घालण्यात आला. आणि, याला सहकार्य लाभले ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश दळवी यांचे. कलाकारांना अशा प्रकारचे व्यासपीठ व कौतुकाची थाप मिळवून देण्याचे कार्य सुरेश दळवी यांनी केल्याचे प्रकाश गवस यांनी सांगितले. यापुढे ही नाट्यकला आणि कलाकार टिकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे गवस यांनी आवर्जून सांगितले आहे.