सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे कार्य शेतकऱ्यांच्या हितासाठी मोलाचे ठरेल! - सुनील राऊळ यांचा विश्वास

सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 17, 2022 18:05 PM
views 162  views

सावंतवाडी : गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ कार्य करत आहे. या खरेदी विक्री संघामध्ये शेतकऱ्यांच्या हितासह नवनवीन तंत्रज्ञान कसे आणण्यात येईल, यादृष्टीने नवीन संचालक मंडळाने प्रयत्न करावेत. आजच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये जुन्या संस्थेलाही एक नवी झळाळी मिळणे आवश्यक आहे, असे मत सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे महा व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी व्यक्त केले.

सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार व गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सह्याद्री फाउंडेशनचे संचालक माजी सभापती प्रमोद सावंत व कंझ्युमर्स सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद गावडे हे दोन्ही खरेदी विक्री संघावर निवडून आले आहेत. त्याबद्दल त्यांचा गौरव सत्कार सुनील  राऊळ व माजी नगराध्यक्ष व सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद तावडे, सचिव सुहास सावंत, माजी सचिव अॅड. संतोष सावंत, माजी अध्यक्ष विजय चव्हाण, शशिकांत मोरजकर, मोहिनी मडगावकर, राजन राऊळ, अशोक सांगेलकर, अजय गोंदावळे, दीनानाथ नाईक, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, अमित परब, आबा केळुसकर, योगेश शेटये, समीर पालव आदी यावेळी उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, सह्याद्री फाउंडेशनमध्ये जे बांधव कार्य करत आहेत ते आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात चमकत आहेत. प्रमोद गावडे आणि प्रमोद सावंत हे दोघेही कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता या संघावर नवनवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल, याकडे लक्ष द्यावे. यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत म्हणाले, मी अनेक पदावर कार्य केले आहे. परंतु आता खरेदी-विक्री संघावर मला ही संधी शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली, त्याचा वापर निश्चितच आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी करेन. सर्वांच्या सहकार्यामुळे मी निवडून येऊ शकलो, असे ते म्हणाले.

 प्रमोद गावडे यांनी सांगितले की, पन्नास वर्षाहून अधिक काळ या संघामध्ये काम केले आहे. कंझ्युमर्स सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना परवडेल, असा खत पुरवठा आम्ही करत आलो आहोत आणि या संस्थेला उचित अवस्थेत आणले. आता निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने खरेदी विक्री संघात नवनवीन बदल केले जातील. सह्याद्री फाउंडेशनने आम्हा दोघा संचालकांचा जो गौरव केला तो खरोखरच आम्हाला उभारी देणारा आहे, असेही ते म्हणाले.  सूत्रसंचालन संतोष सावंत तर आभार प्रल्हाद तावडे यांनी मानले.