करुळ घाटमार्गाचे काम संथगतीने | करुळ पुलाचे काम अपूर्ण तर काॅजवेंची कामे निकृष्ट

संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करा | करुळ सरपंच नरेंद्र कोलते यांची राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 24, 2024 14:10 PM
views 295  views

वैभववाडी : करूळ घाटामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. वाहतूकीसाठी घाट मार्ग ५महीने  बंद करून देखील वैभववाडी - गगनबाडा मार्गाचे काम अपूर्ण राहिले आहे. करुळ नदीवरील पुलाचे काम ही अर्धवट स्थितीत आहे. तसेच रस्ता काॅंक्रीटीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे तर काही दर्जाहीन काम केले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांच्याकडे केली आहे.

तरेळे - गगनबावडा या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी तब्बल २४८ कोटी निधी मंजूर आहे. महामार्ग काॅंक्रीटीकरण करणे कामाला सुरुवात डिसेंबर २०२३पासून करण्यात आली. करुळ नदी वरील पुलाच्या कामाला पाच महिने झाले आहेत. तरी देखील काम अजून अपूर्ण अवस्थेत आहे. पर्यायी मार्ग नदीतून काढण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीतून प्रवाह सुरू होणार आहे. त्यामुळे येथील प्रवास बंद होणार आहे. पुलाचे काम सुरू असल्याने गेले पाच महीने सुरू असलेल्या पर्यायी मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. तो रस्ता निर्धोक करून द्या.

मार्गावर ठिकठिकाणी काॅजवे बांधण्यात आले आहेत. परंतु काॅजवेंची कामे निकृष्ट झाली आहेत. व दरम्यान च्या काळात पाणी न मारल्याने काॅजवेंच्या कठड्यांना भेगा पडल्या आहेत. करुळ चेक नाका ते घाटपायथ्या दरम्यान करण्यात आलेल्या काँक्रिटीकरण कामाला देखील काही ठिकाणी तडे गेले आहेत. खडकवाडी रस्त्यानजीक महामार्गाची उंची वाढल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.  त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दिंडवणे, भट्टीवाडी व खडकवाडी पर्यंत येणाऱ्या नदीपात्रात रस्त्यावरील दगड माती टाकण्यात आली आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलण्याची दाट शक्यता आहे. दगड माती तात्काळ काढण्यात यावी. काही ठिकाणी जमीन मालकांना कोणतीही कल्पना न देता माती उत्खनन करण्यात आलेले आहे. कार्यकारी अभियंता व जिल्हा प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन कामचुकार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी श्री कोलते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.