वन्यजीव जनजागृतीपर व्याख्यानानं 'वन्यजीव सप्ताहा'ची सांगता

सावंतवाडी वनपरिक्षेत्रामार्फत सावंतवाडी तालुक्यामध्ये आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2022 20:11 PM
views 290  views

सावंतवाडी : दरवर्षी महाराष्ट्र शासनामार्फत वन विभागाच्या माध्यमातून 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहाची सावंतवाडी परिक्षेत्र कार्यालयाकडून नेमळे हायस्कूलमध्ये वन्यजीवांच्याबाबत जनजागृतीपर व्याख्यानाने सांगता करण्यात आली.

  वन्यजीव सप्ताहा दरम्यान सावंतवाडी वनपरिक्षेत्रामार्फत सावंतवाडी तालुक्यामध्ये ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, युवक मंडळे यांच्या मदतीने वन्यजीवांच्या विषयी समाजामध्ये जनजागृती पर परिसंवाद, व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. मुळात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागे शासनाचा मुख्य उद्देश हा समाजामध्ये वन्यजीवांच्या विषयी जनजागृती करणे, नागरिकांच्या मनात वन्यजीवांच्याबाबत असलेली भीती घालवणे, वन्यजीवांच्या बाबत समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी-परंपरा तसेच अंधश्रद्धा नाहीशी करून समाजामध्ये त्यांच्याविषयी शास्त्रीय माहिती पोहोचविणे हा आहे. या सर्व जनजागृतीपर मार्गातून वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग मिळवणे तसेच वन्यजीवांच्या अधिवासाला म्हणजेच जंगलाला वाचविण्यासाठी जनमानस तयार करणे हे या उपक्रमातुन सध्या केले जाते. 

        या सर्व गोष्टींचा उद्देश सध्या करण्याच्या दृष्टीने विचार करून सावंतवाडी वनपरिक्षेत्र कार्यलयाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाकडून गेली 7 दिवस सातत्याने ग्रामपंचायती, शाळा, कॉलेज यांचेमध्ये वन्यजीवांच्याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शालेय विध्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा राबविणे, ग्रामपंचायत मध्ये चर्चासत्र आयोजित करणे, महाविद्यालयीन तरुण पिढीसाठी वन्यजीवांच्याबाबत संवादसत्रांचे आयोजन करणे असे उपक्रम पार पाडण्यात आले. या सर्व उपक्रमांची सांगता आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी नेमळे येथील पंचक्रोशी हायस्कूल मध्ये वन्यजीवांविषयी मार्गदर्शनपर चर्चासत्राने करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर हे उपस्थित होते. त्यांनी 'पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वासाठी वन्यजीवांचे असलेले महत्व' याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वने व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन हे मानवी अस्तित्वासाठी किती महत्वपूर्ण आहे हे त्यांनी ज्वलंत उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.

तसेच पर्यावरण संवर्धनामध्ये विद्यार्थी सुध्दा जीवनशैलीतील काही सोप्या बदलांनी कसे सहभागी होऊ शकतात हे पटवून दिले. तसेच वनविभागामध्ये पुढे जाऊन करिअरच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या संधी यांचेविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम हा नेमळे पंचक्रोशी हायस्कूल च्या मदतीने पार पाडण्यामध्ये मळगाव वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक रमेश पाटील, प्रकाश रानगिरे, वैशाली वघामारे, वनसहाय्यक बबन रेडकर यांनी महत्वाचे योगदान दिले.