
सावंतवाडी : आठवडा बाजारावरून मंत्री दीपक केसरकर व भाजपात मतभेद निर्माण झाले होते. भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांच्या कार्यकाळात हा आठवडा बाजार मोती तलाव काठावर भरविला होता. यातच काही दिवसांपूर्वी मंडईच्या नुतनीकरणासंंदर्भात न.प.त आलेल्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी, मोती तलाव काठ विदृप दिसतो ते कधीही आवडणार नाही असं सांगत, हा बाजार जुना बाजार परिसरात होळीचा खुंट येथे हलविण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु, भाजपचा याला विरोध होता. केसरकरांनी विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावेत, पालकमंत्री भाजपचे आहेत याची जाणीव पत्रकार परिषदेत भाजपने करून दिली होती. याच अनुषंगाने उभाबाजार, जिमखाना मैदानावरून मोती तलाव काठावर आलेला हा बाजार कुठे असावा ? याबद्दल जनतेच्या मनातील कौल कोकणसाद LIVE न घेतला होता. अनेकांनी आपले मत नोंदवत यात सहभाग घेतला ७६ % नागरिकांच मत मोती तलावच योग्य आहे असं होतं. तर १४ % होळीचो खुंट तर १० % नागरिकांनी दोन्ही जागा नको असं मत नोंदवत बाजाराच्याच ठिकाणी आठवडा बाजार भरवावा, गणेशोत्सव काळात बाजाराच होणार नियोजन त्या धर्तीवर बाजार भरवावा असे पर्यायही सुचवीले होते. दरम्यान, आज रोजी हा बाजार होळीचा खुंट येथे भरणार अशा सुचना देखील व्यापारी वर्गाला दिल्या होत्या. मात्र, हा आठवडा बाजार मोती तलाव काठावरच भरवला गेला आहे.