शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग हा कृषी प्रगतीतूनच : कुलगुरू डॉ. संजय भावे

Edited by: दिपेश परब
Published on: June 22, 2023 18:18 PM
views 95  views

वेंगुर्ले : सामान्य शेतकरी माझ्याशी थेट संपर्कात आहे. त्यामुळे शेतकरी त्याचबरोबर कर्मचारी अधिकारी वर्गाच्या शक्य त्या अपेक्षा मी नक्की पूर्ण करणार. पुढील काळात आपल्याला शेतकऱ्यांच्या समस्या शोधून त्यावर काम करायचे आहे. शेतकऱ्यांना तुमच्या संशोधनात सामावून घ्या. शेतकरी आमच्यासाठी नाही तर आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसेवाला नाही तर श्रीमंत, समाधानी व समृद्ध करायचं आहे. आणि कृषी प्रगतीतून हा समृद्धीचा मार्ग येतो हे लक्षात ठेवून काम करा असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे १६ वे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी वेंगुर्ला येथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना केले. 

    डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच आज (२२ जून) वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आल्यानंतर फळ संशोधन केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. जी. खांडेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. स्नेहल भावे, आंबा काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंच अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, विद्यापिठ अभियंता निनाद कुलकर्णी, माजी सहयोगी संशोधन संचालक बी.एन सावंत, डॉ एम. बी. दळवी, डॉ महेंद्र गवाणकर यांच्यासाहित विद्यापीठ अधिकारी व समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

  यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉ संजय भावे म्हणाले की, मी याच विद्यापिठात काम केल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या जवळून जाणतो. तसेच आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच सुपुत्र असल्याने याठिकाणी शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत या सुद्धा जाणतो त्यामुळे पुढील काळात या समस्या सोडवण्यासाठी शक्य होईल ते प्रयत्न करण्यात येतील. तसेच राजकारणी सत्ताधारी यांच्या ओळखीचा स्वतःच्या बदलीसाठी अयोग्य वापर कोणीही केलेला खपवून घेतला जाणार नाही असेही ते म्हणाले. या सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एस. देसाई, प्रास्ताविक डॉ. एम. एस. गवाणकर तर आभार प्रदर्शन डॉ. एम. पी. सणस यांनी केले.