
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साटेली-भेडशी (सुतारवाडी) येथील रहिवाशी सूर्यकांत न्हानू धर्णे यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दोडामार्ग तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संतत धार सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे २ वा.च्या सुमारास सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सूर्यकांत धर्णे यांच्या राहत्या घरातील स्वयंपाकघराची आणि इतर भागाची भिंत मोठ्या आवाजासह कोसळली. यावेळी झालेला आवाज ऐकून घरातील मंडळी जागी झाली. कसला आवाज आला हि पाहणी केली असता भिंत संपूर्णपणे कोसळून स्वयंपाकघर जमीनदोस्त झाल्याचे त्यांना दिसून आले.
सुदैवाने घटनेच्या वेळी घरातील सदस्य दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, शनिवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच गावच्या सरपंच छाया धर्णे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तलाठ्यांना पाचारण करून अधिकृत पंचनामा करण्यात आला. सरपंचांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.