'विशाल पर्व' सप्ताहाचा निलेश राणेंच्या उपस्थितीत शुभारंभ

Edited by: भरत केसरकर
Published on: October 10, 2023 11:07 AM
views 153  views

कुडाळ : विशाल हा स्वकर्तुत्वाने मोठा झाला. मी त्याला मित्र नाही तर स्वतः चा भाऊ मानतो. विशाल तुझ्या मनात जे काही आहे, त्यासाठी आम्ही तुझ्या सोबत आहोत. तु आमच्या सान्निध्यात आहेस. जे काय तुला हवे ते राणे कुटुंबातील लोक देतील. असे भाजपा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.

            कुडाळ येथील वासुदेवानंद हाॅल येथे भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने "विशाल पर्व " सप्ताहाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते दत्ता सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, अभिनेते दिंगबर नाईक,उत्सवमुर्ती तथा भाजपा युवा नेते विशाल परब,सौ.वेदिका परब,मुलगा कु.विराज, मुलगी भार्गवी, सासरे रविंद्र परब, वडील प्रभाकर परब,आई सौ.परब, रणजित देसाई,सौ.संध्या तेरसे, अशोक सावंत, प्रकाश मोर्ये, संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, राजु राऊळ, दिपक नारकर, विकास कुडाळकर,मोहन सावंत,रूपेश कानडे, बंड्या सावंत आदी उपस्थित होते.

          यावेळी निलेश राणे म्हणाले की, विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हभप इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाने सुरुवात केली हे चांगलं आहे. हे कार्यक्रम त्याला कोण देतो माहिती नाही.२०२४ हा विषय माझा नाही,पक्ष देईल ते कार्यक्रम आम्ही घेतो.राजकारणात राणेंनी संघर्षाचे दिवस अधिक बघितले.मी तर उतार अधिकच बघितले. विशाल तुझे अनेक मोठे कार्यक्रम एंकुण लोक येत असतात.ही माणसं अशीच कमवुन ठेव,कार्यक्रम होतात पण कोण आपलं कोण परखं ही ओळख तुला राजकारणात ठेवावीच लागते असे राणे यांनी सांगितले.यावेळी प्रमोद जठार म्हणाले की, विशाल हा हुशार माणूस आहे .त्याला धनाची आवश्यकता असते तेव्हा तो साधुसंतांना शरण जातो, राजकारणात यशस्वी होण्यासाठी तो राणेंना शरण जातो, एकुणच विशाल परब यांना वेळ आणि काळ परफेक्ट माहिती आहे.विशाल तु वारकऱ्यांच्या संगतीत राहतोस तुला त्याचा नक्कीच लाभ होईल.तुझा सल्लागार चांगला आहे,नाहीतर पलिकडे बघा संजय राऊत सारखा चूकिचा सल्लागार नेमला म्हणूनच उध्दव ठाकरेंची सत्ता गेली असल्याचे सांगत जठार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. दत्ता सामंत म्हणाले की२०२४ रोजी निलेश राणे यांना आम्ही आमदार करणारच असा विश्वास व्यक्त केला.निलेश राणे प्रत्येक कुटुंबाला आधार देतात पण ते प्रसिद्धी घेत नाहीत असं  सांगितले.

          यावेळी विशाल परब म्हणाले की,पुढच्या वर्षी माझा वाढदिवस याच दिवशी याच हाॅलमध्ये होईल, त्यावेळी मात्र  निलेश राणे आमदार निलेश राणे म्हणूनच येतील.माझ्या आयुष्यात झालेला बदल हा निलेश राणेमुळे आहे.माझ्या हातात लक्ष्मी आहे.माझ्या राजकीय आयुष्यात राणेंशिवाय काहीच नाही,राणे आणि भाजप जे सांगतिल ते आम्ही करणार,हे निश्चित आहे.माझ्या एका फोनवर इंदुरीकर महाराज यांचा कार्यक्रम ठरला.युवापिढी वाम मार्गाने जावू नये यासाठी असे मी कार्यक्रम घेतो.पुढच्या वर्षी योगगुरू रामदेव बाबा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांना निमंत्रित करणार आहे.आज ही माझी सुरुवात आहे,पण ज्या दिवशी माझे साहेब आमदार होतील, त्या दिवसापासून माझी खरी घोडदौड सुरू होईल असे सांगितले.या कार्यक्रमासाठी मोठी उपस्थिती असल्याने हाॅल व बाहेर सहा एलईडी क्रीन लावण्यात आल्या होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा साईल यांनी केले.निवेदन बादल चौधरी यांनी केले.