वेसवी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचं अनधिकृत शाळेच्या विरोधात उपोषण

Edited by:
Published on: October 07, 2024 14:05 PM
views 80  views

मंडणगड : वेसवी येथे सुरु असलेल्या अनधिकृत शाळेच्या विरोधात मुनीरखान साखरकर, आनंद भाटे, इस्माईल उंडरे, सलीम हमदुले, अब्दुलसत्तार हजवाने, मकबुलअहमद नाडकर, लियाकत हजवाणे, शेखमोहम्मद उंडरे, प्रवीण दरीपकर, बदरूद्दीन उंडरे हे वेसवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ 7 ऑक्टोंबर 2024 रोजी मंडणगड पंचायत समितीचे प्रवेशद्वारावर अमारण उपोषणास बसले होते. या विषया संदर्भात कोकण एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी बाणकोट यांच्यावतीने गटविकास अधिकार पंचायत समिती मंडणगड यांना 25 सप्टेंबर 2024 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनातील माहीतीनुसार ग्रामपंचायत वेसवीचे हद्दीत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेत येणारी एक अनधिकृत नियमबाह्य शाळा  सुरु आहे.  आम्ही याबाबत 7 ऑगस्ट 2024 रोजी  आपणाकडे पत्र व्यवहार केला होता. या नियमबाह्य शाळेमुळे परिसरातील 15 ते 16 गावातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत तरी संबंधीत शाळा व संस्था चालकांवर कारवाई करुन शाळा बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही आपल्याकडे केली होती.

मात्र, गेल्या दीड महिन्यात गटविकास अधिकारी पंचायत समिती मंडणगड यांनी या विषया संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आम्हांला विद्यार्थ्यांचे हितासाठी आमरण उपोषण करणे भाग पडत आहे तरी सर्व ग्रामस्थ 7 ऑक्टोंबर 2024 रोजी आमरण उपोषणास बसणार आहोत यांची नोंद घ्यावी उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असल्याचे नोंद घ्यावी असे आवाहनही कऱण्यात आले होते निवेदनावर उपोषणास बसलेल्या सगळ्यांच्या सह्या असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधिक्षक, तहसिलदार मंडणगड, पोलीस निरिक्षक मंडणगड, पोलीस निरिक्षक बाणकोट यांना माहीतीसाठी पोहच करण्यात आली होती व निवेदनातील मागण्यात पुर्ण न झाल्याने ग्रामस्थ  उपोषणास बसले होते.

दरम्यान गटशिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे यांनी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमीक विभाग यांच्या आदेशनानुसार शिक्षण विभागाने नमुद शाळेवर कार्यवाही केलेली असल्याचे तसेच या संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी लक्षात घेऊन भुतकाळातील घडामोडीचा विस्तृत चौकशी अहवाल ग्रामस्थांचे म्हणणे नमुद करुन तयार करण्यात येणार असल्याचे सांगीतले याचबरोबर रितसर मार्गाने योग्य ती सर्व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले व या संदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती मंडणगड यांच्याशी आपण चर्चा करुन आपले उपोषण स्थगित करावे असे आवाहन केले. यानंतर उपोषणास बसलेले ग्रामस्थ, गट शिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे   गटविकास अधिकारी विशाल जाधव  यांच्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांचे दालनात  चर्चाही झाली. एक महीन्याचे कालावधीत उचित कार्यवाहीचे आश्वासन यंत्रणेने दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

सर्व संबंधितांवर कारवाईची उपसरपंच आनंद भाटे यांची मागणी- उपोषणास बसलेले वेसवी  ग्रामपंचायतीचे उपसरपंच आनंद भाटे यांनी शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकाऱ्यांचा पाठींबा लाभल्यानेच खाजगी शिक्षण संस्थेचा गौरख धंदा बोकाळलेला असल्याचा आरोप पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रीयेत केला आहे. 20216-17 सालापासून अनधिकृत शाळेच्या कारभाराबारात तक्रारी करुन आपण यंत्रणेस सजग केलेले आहे असे असतानाही प्रशालेस कायम स्वरुपी नोंदणी क्रमांक, शासनमान्यता, दहावी बोर्डाची मान्यता संबंधीत संस्थेने कसा  मिळवाला असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. प्रशालेच्या मान्यतेच्या दहा मानकांनापौकी कोणतेही एक मानांकन पुर्ण केलेले नसतानाही सदर संस्थेसे सर्व मान्यता शासन व यंत्रणेने दिलेले असल्याने भुतकाळात अनधिकृत शाळेस पाठीशी घालणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. कायम स्वरुपी विनाअनुदानीत खाजगी शाळांना प्रोत्साहन देऊन ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा व शासन अनुदानात खाजगी संस्थांच्या वर्षानुवर्षे सुरळीतपणे सुरु असलेल्या शाळा बंद पाडण्याचा हा डाव तर नाही ना असा प्रश्न ही या निमीत्ताने उपस्थित केला आहे.