
बांदा : मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास बांदा शहरातील निमजगावाडी येथील महादेव सावंत यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या परप्रांतीय चोरट्याला घरमालक श्री सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. काल दिवसभरात घरात शिरून चोरीचा प्रयत्न करण्याची दुसरी घटना शहरात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी जबाब नोंदवून त्याची रवानगी आश्रमात केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील निमजगावाडी येथे मध्यरात्री साडेतीन वाजता श्री सावंत यांच्या घरात अज्ञात इसम शिरला. घरमालक श्री सावंत यांनी शिताफिने त्याला पकडले. यावेळी चोरट्याने श्री सावंत यांना मारहाण देखील केली. झटापट झाल्याने सावंत यांच्या घराशेजारी राहत असलेले श्री कुबल यांनी धाव घेत चोरट्याला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवले.
आवाज ऐकून लगत राहत असलेले ग्रामस्थ वासुदेव भोगले, विशाल भोगले, विलास भोगले, विकी सावंत, शिवराम बहिरे, संजय सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी चोरट्याला पकडून बांदा पोलिसांच्या स्वाधीन केले. काल सकाळी भर दिवसा शहरात सदनिका फोडून परप्रांतीय कामगाराकडून चोरीचा प्रयत्न झाला होता. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आज सलग दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात कामानिमित्त राहत असलेल्या परप्रांतीय कामगारांची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी वासुदेव भोगले यांनी केली आहे.