सिधुदुर्गतील गणेशमूर्तीचे वेगळेपण व्यावसायिक स्वरूपात पुढे नेण्याची गरज!

सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेला उत्साहात प्रारंभ !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 11, 2022 19:41 PM
views 160  views

कुडाळ : सिधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीचे वेगळेपण राज्यातच नव्हे तर देशातही आहे आणि हे वेगळेपण व्यवसायिक स्वरूपाच्या माध्यमातून पुढे नेण्याची गरज आहे.  ही कला टिकवण्यासाठी कुठल्यातरी यंत्रांची पाठबळ आहे म्हणून जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज गणेश मूर्ती कार्यशाळा प्रदर्शन मेळाव्यात केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ  सिंधुदुर्ग व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तरीय इको  फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा  ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ओंकार  डिलक्स हॉल येथे प्रारंभ झाला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांचे हस्ते झालं.  यावेळी माजी आमदार प्रमोद जठार सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,श्री गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, बँक संचालक  विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, सौ.नीता राणे, गणपत देसाई समीर सावंत मुख्य कार्यकारी प्रमोद गावडे नगरसेविका प्राजक्ता बांदेकर नयना मांजरेकर ऍड राजीव कुडाळकर उदय तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकारसह  सातारा रायगड मधून गणेश मूर्तिकार उपस्थित होते.  

जिल्हा बँक अध्यक्ष श्री दळवी म्हणाले  सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80 हजारहून अधिक गणेश मूर्ती केल्या जातात.  यातून  सुमारे 200 कोटीची उलाढाल होते जास्त उलाढाल झाली पाहिजे. या  गणेशमूर्ती घडविण्याला व्यवसायाचे स्वरूप मिळाले पाहिजे.  यासाठी जिल्हा बँकेने वाटचाल केली आहे, असे  सांगितले. 

आमदार प्रमोद जठार म्हणाले, कलेला राजाश्रयाची गरज आहे. गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धा या  वेगळ्या विषयाला अनुसरून जिल्हा बँकेने या कलेला व्यवसायाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन जी वाटचाल केली ती अतिशय कौतूकास्पद आहे. अशा प्रकारच्या कलेच्या माध्यमातून हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे जतन केले जात आहे. आपल्या या कलेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना विविध कलांतून या जिल्ह्यात  पर्यटक मोठया प्रमाणात यावेत, असा संकल्प करूया, असे सांगितले.   

युवराज लखमराजे यानी आपण पर्यावरण जपले पाहिजे, भविष्यात पर्यावरणाची जोपासना न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.  आपण  गणेश मूर्ती बनवतो त्यासाठी वापरणारा रंग हा ऑइलपेंट असतो तो रंग  बदलून ऑरगॅनिक रंग या गणेशमूर्तीसाठी वापरण्याची काळाची गरज असल्याने स्पष्ट केले. 

उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा हा कौतुक करण्याचा उपक्रम आहे. पेणमध्ये पीओपीचे हब आहे तसा पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचा  हब सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला पाहीजे.  जिल्ह्यात  गणेशशाळा ऐवजी गणपतीचा कारखाना झाल्यास  व्यवसायिक स्वरूप प्राप्त होईल.  जिल्ह्यातील 120 गणेशमूर्तिकार इको  फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शनात सहभागी झाले  हे प्रगतीचे द्योतक असल्याचे सांगितले आभार नवीन मालवणकर  यांनी मानले


स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १३ नोव्हेंबरला सायंकाळी ३.३० वा माजी  खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये आतापर्यंत १२० मूर्तीकारांनी सहभाग नोदवला असुन जिल्ह्यातील गणेश भक्तांना १२० अप्रतिम कलाकृती पहाण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. उद्या  शनिवारी १२ व १३ नोव्हेंबरला अक्षय मेस्त्री, घोडगे सिध्देश तेली, परूळे यांना मूर्तिकार प्रात्यक्षिकांसाठी निमंत्रित करण्यात आले असुन गणेश भक्तांना या दोन दिवशी गणेश मूर्ती घडत असतानाचे प्रात्यक्षिक पहाता येणार आहे.