माजगावातील सातसावंतांचा 'मामा-भाच्यांचा' गणपती

४५ कुटुंबाची अनोखी परंपरा
Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2025 15:05 PM
views 140  views

सावंतवाडी : माजगावातील सावंत परिवाराच्या मुळपुरुषाने भाच्याला दिलेला शब्द आणि यातून निर्माण झालेली परंपरा गेल्या अनेक पिढ्यासून सुरु आहे. सातसावंतांचा म्हणजेच ''मामा-भाच्यांचा'' हा गणपती आहे. ४५ कुटुंब अन् सुमारे ५०० हुन अधिक सदस्य एकत्रित येत कोकणचा हा सर्वात मोठा उत्सव साजरा करतात.


सावंतवाडीनजीक असलेल्या  माजगाव गावातील हे सातसावंत खोत घराणे‌. या घराण्यात पूर्वापार गणपती उत्सव साजरा केला जातो. पिढ्यांपिढ्यांपासून सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे. या घराण्याच्या मूळ पुरुषाचे नाव सातू सावंत होते. त्यावरून या घराला सात सावंत असे नाव पडले. आता या घराण्याच्या गणपती उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेय. 


दरम्यान, हा गणपती करणारा कलाकार गावातील कुंभार सांगवेकर नावाचा होता. त्याला मोबदला स्वरूपाने गावात या घराण्याने आपल्या मालकीची जमीन दिलीय. तसेच गणपतीचा रंग, तेल, वात त्यावेळचे व्यापारी श्री नाटेकर देत असत. त्यांच्यासह गणपतीसमोर नृत्य, गायन करणाऱ्या कलावंतांनाही या घराण्याने जमिनी दिल्यात. यामागील मूळ हेतू गणपतीची सर्व व्यवस्था परंपरागत चालू राहावी हा होता. गणपतीची मूर्ती करण्याचे काम सांगवेकर यांच्याकडे होते. मात्र, पुढे त्यांच्याकडे कलाकार न उरल्याने १९६७ पासून सातसावंत घराण्यातील काही पुरुषांनी स्वतः मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. गणपतीची मूर्ती आजही तेल रंगाने रंगविण्यात येते. २१ गोळ्यांपासून ही मूर्ती तयार केली जाते. त्यासाठी सातसावंत घराण्यातील जाणते व तरुण वर्ग परिश्रम घेतात. यापूर्वी ही मूर्ती चंद्रकांत सावंत बनवत असत. वजनाने अवजड भली मोठी मूर्ती उत्सवा करिता घरात नेणे व विसर्जना करिता महादेव मंदिरानजीक जवळपास १ किलोमीटर अंतरावर नेणे ही महत्त्वाची बाजू असते. आजही विसर्जनाला प्रथम मुख्य घरातून मूर्ती अंगणात आणली जाते. मूर्तीच्या चौरंगाला दोन्ही बाजूने लाकडी वासे बांधले जातात. सुमारे २० ते २५ जण ही मूर्ती खांद्यावर मघेऊन गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन मिरवणूकीस निघतात. फटाक्यांच्या आतषबाजीने ही मिरवणूक सातेरी मंदिर मार्गे महादेव मंदिराकडील तलावाकडे जाते. आता यासाठी आधुनिक रथाचा वापर केला जातो. 


येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळच्या मूळ पुरुषाने आपला भाचा तांबोळी येथील देसाई यांना आपली धार्मिक अडचण होऊ नये म्हणून येथे स्थायिक केले होते. गणपतीबरोबर श्री देसाई यांच्या मूर्ती पूजेस अनुमती दिली होती. त्यामुळे या घराण्यात दोन दैवते एकत्र पूजनाचा सोहळा अनुभवायला मिळतो. या घराण्यात एकूण ४५ स्वतंत्रपणे राहणारी कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबाची उत्सवाची वर्गणी ठरलेली असते. यामुळे आजच्या महागाईतही या प्रत्येक कुटुंबाचा वार्षिक खर्च प्रत्येकी दहा ते बारा हजारा एवढा वाचू शकतो. पूर्वी या सात सावंतांच्या कुटुंबात एकूण चार भाऊ होते. ते एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असत व आजचा दिसणारा उत्सव पूर्वीही ते तसाच साजरा करीत. त्यावेळी कुटुंब प्रमुख म्हणून राघ अर्जुन सावंत काम पाहत असत. त्यांच्यानंतर काकू सावंत, रामचंद्र सावंत, वामन सावंत, के. व्ही. सावंत अन् आता माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. के. सावंत हे या घराण्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या सल्ल्याने या सात सावंत घराण्याचे सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. मामा-भाच्यांचा हा सातसावंतांचा गणेशोत्सव म्हणजे कोकणतील एकत्र कुटुंब पद्धतीच एक जीवंत उदाहरण मानलं जातं आहे. २१ व्या शतकातही सातसावंत कुटूंबांन‌ ही परंपरा जपली आहे हे या उत्सवाच विशेष आहे.