कुडाळातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाला ठाकरे गट देणार धडक : सतीश सावंत

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 12, 2024 10:58 AM
views 324  views

कुडाळ : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून मंजूर असलेल्या कामांना वर्कऑर्डर दिल्या जात नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोमवार दि १५/०१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात धडक देऊन  कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर कामांच्या वर्कऑर्डर देण्यास भाग पाडणार आहोत.अशी माहिती  सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून अनेक कामे मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता झाली आहे. निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून या कामांच्या वर्कऑर्डर दिल्या जात नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे रखडली आहेत. सत्तारूढ पक्षाकडून या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे. केंद्र आणि राज्य सरकार हि कामे करण्यामध्ये अपयशी ठरत आहे. त्यामुळे यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोमवार दि १५/०१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्यात येणार असून कामांच्या वर्कऑर्डर देण्यास भाग पाडणार आहोत. याबाबत आवाज उठवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. तरी ज्या ज्या ठिकाणी  मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधील रस्त्यांच्या कामांच्या वर्कऑर्डर निघाल्या नसतील त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी सोमवारी कुडाळ येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात उपस्थित रहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.