
दोडामार्ग : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या महिलांसाठीच्या नऊवारी फॅशन शो स्पर्धेत दोडामार्ग बाजारपेठेतील नव्या नुपूर फुलारी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. गोव्यातील माशेल येथे अभेद रंग संस्कार गोवाने पर्व सहावे अंतर्गत या स्पर्धेचे भव्य आयोजन केले होते. त्यात सौ. फुलारी यांनी हे यश मिळविले.
माशेल येथील माडपोइ येथे आयोजित या स्पर्धेत असंख्य महिला स्पर्धक सहभागी झाले होते. नऊवारी साडी फॅशन शो व डान्स अशा या स्वरूपाच्या स्पर्धेत नेहा अरोस्कर यांनी प्रथम, स्नेहाली नाईक यांनी द्वितीय तर नव्या फुलारी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. संतोष तारे व गौरी गावकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. संतोष तारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित झाली होती. नव्या फुलारी यांनी यापूर्वी गोवा तसेच सिंधुदुर्ग मध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केले आहे. दोडामार्ग बाजारपेठेतील पिंपळपान ग्रुपने आयोजित केलेल्या फॅशन शो स्पर्धेत फुलारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. गोव्यातील त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण दोडामार्ग शहरातून त्यांचे कौतुक होते आहे.










