शिक्षक समिती जपत असलेली सामाजिक जाणिव वाखाणण्याजोगी : शिक्षणाधिकारी महेश धोत्रे

१४ केंद्रामधून प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण ४२ विद्यार्थी दत्तक
Edited by: दिपेश परब
Published on: July 18, 2023 13:47 PM
views 264  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला मार्फत शिक्षक समितीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दत्तक पालक उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी उत्साहात संपन्न झाला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील १४ केंद्रामधून प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण ४२ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. शिक्षक समिती च्या शिलेदारांनी या उपक्रमासाठी स्वयंस्फूर्तीने निधी जमा केला. या निधी मधून समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

      या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक समिती चे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, कोकण विभाग सरचिटणीस संतोष परब, जिल्हा सचिव सचिन मदने, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, सुरेखाताई कदम, पंचायत समिती माजी सभापती जयप्रकाश चमणकर, समितीचे तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, सचिव प्रसाद जाधव , प्रवक्ते भाऊ आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

    मागील वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक समितीच्या पाईकांच्या सहकार्याने समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम प्रत्येक समिती शिलेदार करत आहे.  शिक्षक समिती वेंगुर्ला ने यापूर्वी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दत्तक पालक या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिक्षक समिती वेंगुर्ला चे आभार मानले आणि कौतुक केले. 

     शिक्षक समितीसाठी आपली संपूर्ण कारकीर्द ज्यांनी समर्पित केली अशा सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच बदली मुळे वेंगुर्ला तालुक्यात सेवा बजावून दुसऱ्या तालुक्यात गेलेले आणि तालुका बदलून वेंगुर्ला तालुक्यात आलेले शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा व सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोकण विभाग सरचिटणीस पदी नवनियुक्त झालेले संतोष परब , रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाच्या अध्यक्षपदी निवड झालेले शंकर उर्फ  राजू वजराटकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी वेंगुर्ला संचालक पदी निवड झालेले सिताराम लांबर, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनोद मेतर यांचा सत्कार करण्यात आला.

      या सोहळ्याचे औचित्य साधून समितीचे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून सिताराम नाईक , उपाध्यक्ष म्हणून कर्पूरगौर जाधव, सहसचिव म्हणून रवींद्रनाथ गोसावी,  तालुका संपर्क प्रमुख म्हणून रामचंद्र झोरे यांची नावे जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊ आजगावकर यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिताराम नाईक आणि ऋतिका राऊळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कर्पूरगौर जाधव यांनी मानले.