
सावंतवाडी : पाडलोस-सोनुर्ली नवीन मार्गावरील पोटयेकुंभवाडी येथे मातीचा भराव घालून केलेल्या रस्त्याची साईडपट्टी कोसळली आहे. तसेच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत व रस्ता यामध्ये चर पडला आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाडलोस, सोनुर्ली भागात गेले आठ दिवस कोसळत असलेल्या सततच्या पावसामुळे पोटयेकुंभवाडी येथे 25 ते 30 फूट लांब साईडपट्टी कोसळून रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता भराव टाकून करण्यात आला. काही अंतरावर संरक्षक भिंत उभारण्यात आली मात्र, काही भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा फूट खोल सखल भाग निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाहे. त्यामुळे संबंधित विभागाने याठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.