शिंदे गट देणार रविवारी विजयी उमेदवारांचे आकडे

मंत्री दीपक केसरकरांचे स्वीय सहाय्यक झाले सरपंच !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2022 17:08 PM
views 399  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला तालुक्यातील कोचरे ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आपला झेंडा फडकवला आहे. मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश तेली थेट सरपंचपदी भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. नवनिर्वाचित सरपंच योगेश तेली यांच्यासह ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवारांच मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अभिनंदन करण्यात आले. 


कोचरे ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेन आपला झेंडा फडकवला असून सरपंच पदी मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश तेली तब्बल ७११ मत घेत विजयी झाले. त्यांच्या विरोधातील उमेदवार विनीत किनळेकर यांना ५१२ मत पडली. १९९ मतांचं लीड घेत तेली यांनी त्यांचा दारूण पराभव केला. कोचरे गाव विकास आघाडीच्या पॅंनलन आपलं वर्चस्व प्रस्थापित केले. या पॅंनेलचे सर्वाधिक मतांनी विजयी सदस्य गुरूनाथ शिरोडकर, अनिल सुतार यांसह बिनविरोध निवड झालेले स्वरा हळदणकर, प्रगती राऊळ, संजय गोसावी, विशाल वेंगुर्लेकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी शाल व पुष्पहार अर्पण करत सत्कार केला. तर माजगाव येथील विजयी सदस्य शितल भोगणे यांचाही सन्मान करण्यात आला. 


याप्रसंगी जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, पक्षात फुट पडलेली असताना कासवाची भूमिका घेत आम्ही शर्यत जिंकलेली आहे, सश्याच्यी भुमिका घेतल्यांनी आमच्यावर टीका केली. परंतु, जिल्ह्यात आम्हाला यश मिळाले आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत यशस्वी अशी वाटचाल आमचा पक्ष करणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास काम मार्गी लागली आहेत‌. नवीन योजना युतीच्या माध्यमातून कार्यान्वित होत आहे. आमचे सदस्य व सरपंच राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवतील असा विश्वास जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला.


मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गावात केलेल्या भरघोस अशा विकासामुळे गावचे मतदार माझ्या पाठीशी राहिले. विकास कामांवर विश्वास ठेवून दिलेल्या संधीच निश्चितच आम्ही सोनं करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे यांच मोठ्या प्रमाणात सहकार्य मला लाभलं. ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी माझा भर असणार असून मंत्री दीपक केसरकर यांचा स्वीय सहाय्यक म्हणून मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असं मत नवनिर्वाचित सरपंच योगेश तेली यांनी व्यक्त केले.


बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने तालुक्यात मिळवलेल यश हा ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है असं मत महिला जिल्हा संघटक अँड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. 


दरम्यान, तालुकाप्रमुख बबन राणे म्हणाले, बहुतांश ठिकाणी आम्ही युती केली. काही ठिकाणी भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढलो. आम्हाला मिळालेल्या यशाचा तपशील रविवारी सायंकाळी तुम्हाला देऊ, आमच्या पक्षाचे आलेले सरपंच, सदस्य यांची संख्या जाहीर करू अशी माहिती दिली. 


यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, आबा केसरकर, महिला जिल्हा संघटक अँड. निता सावंत-कविटकर, श्री घाग, सुभाष चौधरी, देवदत्त साळगावकर, आपा राऊळ आदी उपस्थित होते.