
सावंतवाडी : कारीवडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ चे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेत मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून शाळा दुरुस्ती संदर्भात लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी केला आहे.
गेले दोन दिवस सावंतवाडी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. कारिवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. वारंवार लक्ष वेधून दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने याची दखल घेवून शाळा दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रवी परब यांनी केली आहे. तसेच जर मुलांचे यात कोणतेही नुकसान झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा देखील यावेळी परब यांनी दिला आहे.