
वैभववाडी : कुसूर-नापणे रस्ता खचला आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता अधिक आहे.वाहनचालक चिंताग्रस्त झाले आहेत. कुसूर - नापणे हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जातो. तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावांना वाहतूकीसाठी सोयीस्कर असणारा हा मार्ग आहे. गेले कित्येक वर्षे हा मार्ग खड्डेमय होता. गेल्यावर्षी या मार्गाच्या काही भागाचे नुतनीकरणाचे कामही करण्यात आले होते. त्यामुळे वाहन चालकांना हा वाहतूकीसाठी सुरक्षित बनला होता. प्रवासी वाहतूकीसह अवजड वाहतूक या मार्गाने होते.वाळू, चिरे वाहतूक करणारे डंपर, ट्रक मोठ्या प्रमाणात याच मार्गाने जातात.
या अवजड वाहतूकी मुळेच हा मार्ग खचला आहे.येथून वाहतूक करणे सध्या धोकादायक आहे.रात्रीच्या वेळेस मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याठिकाणी सध्या छोटी वाहने या मार्गावर जात आहेत.मात्र येत्या काही दिवसांत हा संपूर्ण मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.संबधित विभागाने यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.