
मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन, वाहतूक व वाळू साठ्या विरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. गेले काही दिवस ही कारवाई सुरु आहे. गुरुवारी सकाळी वायंगणी येथील ६५ ब्रास अनधिकृत उत्खनन करून ठेवलेला वाळू साठा सील करत जप्त केला होता. त्यानंतर मध्यरात्री देवली सडा येथे तब्बल 28 डंपरसह डंप केलेला वाळू साठा जप्त केला आहे. महसूलच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अनधिकृत वाळू विरोधात महसूल विभाग ऍक्शन मोड मध्ये आला आहे. ५ जानेवारी रोजी आंबेरी सडा याठिकाणी धाड टाकत सुमारे १ हजार ब्रास वाळू साठा सील करण्यात आला होता. गुरुवारी वायंगणी येथे वाळू साठा जप्त केला. त्यानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक एस ए भोसले (ओरोस), मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, पीएसआय झांजुरणे यासह महसूल व पोलीस पथकाने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सागरी महामार्ग वरून आतील कच्च्या रस्त्यावर देवली सडा येथे ही कारवाई केली. २८ डंपर व डंप केलेला वाळू साठा ताब्यात घेतला आहे. डंपर ड्रायव्हर पळून गेले आहेत. मार्गावर अनेक ठिकाणी वाळू डंप केलेली दिसून आली आहे. सर्वांचे पंचनामे सुरू होते. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. ज्या डंपर मध्ये वाळू साठा भरून होता ते डंपर मालवण तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई सुरू होती. तर उर्वरित डंपर व डंप वाळू साठा यांचा पंचनामा सुरू होता. डंपर मध्ये वाळू भरण्यासाठी असलेला एक जेसीबी पळून गेला त्याचीही माहिती घेण्याची काम सुरू होती. असेही महसूल पथकाने सांगितले. एकूण या कारवाईत जास्त संख्येने महसूल पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी होते.