मागितलेला निधी शंभर टक्के देणार : आ. निलेश राणे

चौफेर विकासासाठी महायुतीला विजयी करा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 01, 2026 20:04 PM
views 92  views

कुडाळ : पावशी मतदार संघातील जिल्हा परिषद प्रशासकीय मान्यता मिळालेली  15 कोटी 51 लाख रकमेची 29 कामे आहेत. ही कामे आता थांबणार नाहीत. मागच्या अनेक वर्षापासून आपण विकास कामापासून वंचित राहिलो. पालकमंत्री, खासदार, आमदार आपले मग जिल्हा परिषद सदस्य पण आपलाच पाहिजे. कुठेही निधी कमी पडू देणार नाही. तुम्ही मागाल ते शंभर टक्के देणार म्हणजे देणारच. सभागृहात गेल्यानंतर पारदर्शक कारभार करा. लोकांना तो आवडला पाहिजे. काही ठिकाणी सदस्याच्या आजूबाजूचा विकास होतो. परिसराचा होत नाही. असा विकास काय कामाचा नाही. चौफेर विकास झाला पाहिजे. जिल्हा परिषद हे आठ हेड खाली चालणारे संस्थान आहे. आरोग्य, पशुसंवर्धन, रस्ते, महिला व बालकल्याण अशा वेगवेगळ्या आठही विभागाला न्याय देऊ शकतो तो खरा जिल्हा परिषद सदस्य. या सगळ्या कॉलेटी दादा साईल यांच्याकडे आहेत.महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्याल याची आपल्याला खात्री आहे. जे काय काम करायचे आहे ते शंभर टक्के करून द्यायची ग्वाही नाही तर आज तुम्हाला शपथ देतो. जे काम होईल ते दर्जेदार व पारदर्शक होईल, असे आमदार निलेश राणे यांनी रविवारी पावशी मिटक्याचीवाडी येथे सांगितले.

 पावशी जि. प. व पं. स. मतदार संघातील शिवसेना व भाजप महायुती जि. प. उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल व पं. सं. उमेदवार करुणा पावसकर यांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा आज पावशी-मिटक्याचीवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा प्रमुख दत्ता सामंत,  जि. प. माजी अध्यक्ष काका कुडाळकर,अरुण सावंत, पावशी माजी सरपंच पप्या तवटे,पावशी जि. प. मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दादा साईल, पावशी पं. स. उमेदवार करुणा पावसकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, अरविंद करलकर आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार निलेश राणेच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.पावशी माजी सरपंच पप्या तवटे यांनी आमदार निलेश राणे यांचे स्वागत केले.

निलेश राणे म्हणाले, आता कुठेतरी या मतदारसंघाला चांगले दिवस आलेत.  महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आहोत. दादा साईल स्वतः इंजिनियर आहेत. प्रशासनाशी त्यांची चांगली ओळख आहे. त्यामुळे कुठेही ते कामाला कमी पडणार नाहीत. एक वेळ आम्ही कुठेतरी कमी पडू परंतु ते कमी पडणार नाही.  आपल्याला ही निवडणूक कोणावर टीका करण्यासाठी नाही आहे. आपण अजिबात कुठल्या विरोधकावर  टीका करणार नाही. विरोधकांचे नाव देखील घेत नाही. कारण टीका करण्यासारखं काहीच नाही. जेवढी विकास कामे मागच्या वर्षांमध्ये आपण लोकांना देऊ शकलो. त्या तुलनेत मागच्या दहा वर्षात 25% पण कामे माजी आमदारांनी आपल्या मतदारसंघात आणली नाही. त्याचा कोणी तपास करा. मग त्यांना का म्हणून मतदान  करायचे. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. तुमच्या आशीर्वादानेच आपण आमदार झालो. हे ऋण कुठेतरी फेडावे लागतील. म्हणून दिवसरात्र काम करूया. आपल्या या मतदार संघासाठी कुठे पैसे राहिले. कुठे मागू शकतो, कुठे रखडले आहेत हे जाणून घेण्याच आम्ही करतो. हा फक्त कागदावरती विकास नाही. काही कामे सुरू झाली तर काही कामे संपली आहेत. खोट बोलणार नाही. कारण खोटं बोलून आपल्याला मत नकोत. जे सभागृहात मांडले ते तुम्हाला सांगितले. जेथे काही रखडले आहे ते सगळे आणणार यासाठी ही तळमळ आहे. या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर गेले ते राणेसाहेबांमुळे ते कोण नाकारू शकत नाही विरोधकही नाही. आपल्याला दर्जेदार उमेदवार का पाहिजे कारण कामेही दर्जेदार झाली पाहिजेत. जिल्हा परिषद 27 वर्ष राणेकडे होती. कधी भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. कधी कोण सांगू शकल नाही जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचार झाला. त्यामुळे अशी पारदर्शक संस्था चालविण्यासाठी उमेदवाराही तसेच पाहिजेत. सत्ता ही महायुतीकडेच राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

माजी आमदार तुम्हाला काहीतरी सांगतील देणार काही नाही. फक्त अफवा कुठेतरी तयार करायच्या राणेबद्दल त्यांच्या मनात द्वेष. आम्हाला महायुती बद्दल विरोध नाही पण आम्हाला फक्त राणेबद्दल विरोध. तुम्ही फक्त एका कुटुंबामागे राहिलात राणे सगळे पदावर गेले. हा राग तुम्ही राणे कुटुंबावर काढीत नाहीत तर जिल्ह्यावर काढत आहात. या जिल्ह्याने तुम्हाला आमदार केल त्याच पण देण लागता, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली.