झेडपी निवडणूकित कोकणच्या राजकारणात नितेश राणेंचा महाधमाका!

उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल
Edited by: संदीप देसाई
Published on: February 01, 2026 22:49 PM
views 303  views

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप घडवणारी घडामोड घडली आहे. उबाठा (ठाकरे) शिवसेनेला जयमहाराष्ट्र केलेले कणकवली विधानसभा प्रमुख तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले आहे.

रविवारी सायंकाळी उशिरा कणकवली तालुक्यातील हरकुळ बु. येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात सावंत यांनी आपल्या शेकडो समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय. एन जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या एका घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून, कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे.


जुने ऋणानुबंध पुन्हा जागले – ‘घरवापसी’ची चर्चा

सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. राजकीय मतभेदांमुळे त्यांनी मधल्या काळात ठाकरे गटाची वाट धरली होती. मात्र, आता पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पुनरागमन केल्याने  त्यांची ‘घरवापसी’ झाली, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


ठाकरे सेनेला स्थानिक पातळीवर खिंडार

सतीश सावंत यांच्यासोबत हरकुळ बु. सरपंच आनंद ठाकूर, भिरवडे सरपंच नितीन सावंत, बेनी डिसोझा, मंगेश सावंत यांच्यासह अनेक ग्रामपंचायतचे सदस्य, लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच झालेला हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी राजकीय ‘मोठा सुरुंग’ ठरल्याचे चित्र आहे.

सहकार क्षेत्रातही भाजपची पकड मजबूत होणार

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून सतीश सावंत यांचा सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बँक, विकास सोसायट्या, ग्रामीण अर्थकारण, या सर्व आघाड्यांवर भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बबलू सावंत यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.