बँक व जिल्हावासियांमधील नातं, ऋणानुबंध अधिक घट्ट होताहेत : मनिष दळवी

Edited by:
Published on: May 27, 2024 14:33 PM
views 86  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा बँक ही आपल्या सगळ्यांची आहे आणि ती आपली आहे असे समजुन ती वाढवण्यासाठी, मोठी होण्यासाठी आणि तिचा विस्तार होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा, बँकींग क्षेत्रात जेवढ्या सुविधा आज उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधा आज जिल्हा बँक देत आहे. आपण आत्तापर्यंत जो विश्वास दाखवला आहात तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी  यांनी आज तुळसुली शाखा स्थलांतर सोहळ्याच्या वेळी केले.         

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची तुळसुली शाखा नुतन वास्तुमध्ये स्थलांतरीत करण्यात आली.तुळसुली शाखा स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये,घावनळे विकास संस्थेचे अध्यक्ष सखाराम खोचरे, माणगांव विकास संस्थेचे अध्यक्ष अविनाश राणे, तुळसुली सरपंच मिलींद नाईक, घावनळे सरपंच सौ. आरती वारंग, उपसरपंच दिनेश वारंग, आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, केरवडे तर्फ माणगांव सरपंच सौ. श्रिया ठाकूर, तुळसुली पोलीस पाटील संतोष वेंगुर्लेकर, दाजी धुरी, विजय उमळकर, अनिल खोचरे, चंद्रकांत कर्पे, बाबा वारंग, आनंद वारंग, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, तुळसुली शाखा व्यवस्थापक दत्ता कोरगांवकर,तालुका विकास अधिकारी श्याम सरमळकर,विकास अधिकारी विलास धुरी,जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच तुळसुली गावचे ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना मनिष दळवी म्हणाले की, कै. शिवरामभाऊ जाधव साहेब व ढोलम साहेब यांच्या विचारातून घडलेली ही बँक आदरणीय राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने नेत्रदिपक कामगिरी करत आहे. आज जिल्ह्यात काही संस्था ठेवीदारांना विविध आमिषे दाखवून ठेवी गोळा करीत आहेत व कालांतराने या ठेवी असुरक्षित होत असून त्याची वसुली करण्यासाठी ठेवीदारांना हेलपाटे मारावे लागत आहेत म्हणूनच ठेवीदारांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता आपल्या कष्टांनी मिळवलेला पैसा जिल्हा बँकेमध्ये गुंतवावा व हा गुंतवलेला पैसा सुरक्षित ठेवण्याची हमी आम्ही देत आहोत असे ते सांगुन मान. श्री. मनिष दळवी पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने विविध डिजीटल माध्यमांतून वृद्ध व आजारी व्यक्तींनां थेट घरपोच बँकींग सुविधा सुरु केली आहे. आणि पुढील काळातही अशा प्रकारच्या नवनवीन सुविधा देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. केवळ बँकेचा फायदा होउन चालणार नाही तर ग्रामिण भागातील सर्वाची आर्थिक उन्नती झाली पाहीजे. यासाठी नोकरीसाठी इतरत्र न जाता असलेल्या संधीचा वापर करुन केंद्रशासन, राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेउन छोटे मोठे रोजगार उभे केले पाहीजेत. आणि त्यासाठी लागणारे मार्गदर्शन जिल्हा बँकेच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

या सोहळ्यात प्रारंभी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी प्रास्ताविक करुन तुळसुली शाखेच्या प्रगती विषयक माहिती सांगुन उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, तुळसुली विकास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र के. वारंग यांनी आपले  मनोगत व्यक्त केले.