
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत बाबू शिंदे यांनी यावर्षीही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा पेटी बाजारात आणली आहे. सलग नऊ वर्षे ते जानेवारीच्या पहिल्या आठवडयात आंबा बाजारात आणत आहेत. एक आंबा पेटी अहमदाबाद येथे तर दुसरी मुंबई वाशी मार्केटला पाठविली आहे.
हवामानातील सतत होणारे बदल, त्यामुळे कराव्या लागणाऱ्या फवारण्या त्यातून चांगल्या प्रकारचा आंबा काढणे फार कठीण झाले आहे. गेली नऊ वर्षे मेहनतीच्या जोरावर शशिकांत शिंदे आंबा बाजारात आणत आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचा मुलगा दीपक मदत करत आहे. सुरवातीच्या काळात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबा पेट्या बाजारात येत होत्या. आता मात्र बागायतदार आधुनिक बनलेत. नवे तंत्र वापरुन ते लवकर आंबा बाजारात आणत आहेत.