
सावंतवाडी : अहमदाबाद येथे दुर्दैवी आणि भयावह विमान अपघात झाला आणि विमानातील २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ५०-६० जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला.
विमान उड्डाण झाल्या झाल्या तीस सेकंदात पायलटने "मे डे" हा डिस्ट्रेस काॅल दिला. अति तात्काळ मदत करा असं सांगणारा हा "मे डे" काॅल आहे.
पायलट तीन वेळा मेडे मेडे असं ओरडत होते असं आता उघड झालं आहे. असाच काॅल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता दररोज दर तासाला देत आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, अति तात्काळ मदत करा 'मेडे मेडे'. पण, कोणालाही तो ऐकू येत नाही. गरीबांचा मृत्यू कधी ॲंब्युलंसमध्ये तर कधी गोवा मेडिकल कॉलेज हाॅस्पिटलमध्ये होत आहे.असाच "मे डे" काॅल गावागावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि सावंतवाडी, बांदा, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, मालवण, देवगड येथील नागरिकही खंडीत विजप्रवाहाच्या बाबतीत दररोज देत आहेत. पण, एमएससीबी सह जिल्ह्यातील पालकमंत्री आणि आमदारांना तो ऐकूच येत नाही. बहिरेपणा एवढा तीव्र आहे की असे डिस्ट्रेस काॅल ऐकूच येत नाहीत. दिवसरात्र अंधारात काढण्याशिवाय पर्याय नाही.
पण, सामान्य भोळ्या जनतेला महादेवाचे ज्योतिर्लिंग आणून सोहळे साजरे करून भूल घालण्याची कला मात्र आवर्जून जोपासली जात आहे. एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे
शिव शंभो महादेव असंख्य डोळ्यांनी पाहत आहे. अनेक कानांनी ऐकत आहे. त्याचा तिसरा डोळा कधी उघडेल आणि त्याचं तांडव नृत्य कधी सुरू होईल हे कोणालाच सांगता येत नाही. सामान्यातील सामान्य जेंव्हा त्रस्त होतो तेंव्हा महादेव क्रोधित होतो हे लक्षात ठेवावे. सामान्य जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं डॉ जयेंद्र परुळेकर म्हणाले.