
वेळणेश्वर - गुहागर : भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रथम रेडिओ किरणांवर संशोधन केले. त्यांना रेडिओ किरणांच्या सहाय्याने संदेशवहन करता येते , हे सिद्ध करायचे होते. १८८५ साली कोलकत्ता येथे एका व्याख्यानातून कळ दाबून, दूरवर प्रयोगशाळेत स्फोट करून त्यांनी यशस्वी प्रयोग केला होता. त्यानंतर इंग्लंडमधील रॉयल सोसायटीने बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित केले आणि तेथे व्याख्यानातून दूरवर असलेल्या प्रयोगशाळेत, स्फोट करण्याऐवजी, दिवा पेटवून त्यांनी तेथेही हा यशस्वी प्रयोग केला. त्यावेळी जन्माने जर्मन असलेले मार्कोनी इंग्लंडमध्ये होते. त्यांनी डॉ. जगदीशचंद्र बोस यांचेकडून रेडिओ किरणांच्या या संशोधनाची माहिती घेऊन, रेडिओ किरणांच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी संदेशवहन पाठवून दाखवला. आणि त्यांना रेडिओ चे जनक म्हणून नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र त्यानंतर भारतीय इतर शास्त्रज्ञांनी आवाज उठवल्याने, रेडिओ चे जनक म्हणून डॉ.जगदीशचंद्र बोस आणि मार्कोनी असा उल्लेख करण्यात आला आहे, अशी अभ्यासपूर्ण माहिती, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च,मुंबईचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिली. ते विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित, गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम इंजिनिअरींग महाविद्यालय वेळणेश्वर येथील नाना फडणवीस सभागृहात, पुंजकिय विज्ञान व तंत्रज्ञान ( कॉन्टम सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी) विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
डॉ.सुधाकर आगरकरांनी पुंजकिय विज्ञान व तंत्रज्ञान ( कॉन्टम सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी) विषयी बोलताना सन २०२५ हे वर्ष युएनए ने , "जागतिक पुंजकिय विज्ञान आणि तंत्रज्ञान" म्हणून जाहीर केले आहे. आणि हे पुंजकिय विज्ञान आणि तंत्रज्ञानावर - कॉम्प्युटर , रसायनशास्त्र , सेन्सर, क्रिप्टोग्राफी ( डेटा आणि डेटाबेस व्यवस्थापित आणि संग्रहीत करणे) आदी क्षेत्र आधारित आहेत. पुजकिय संगणक ( कॉन्टम कॉम्प्युटर) च्या प्रचंड क्षमतेमुळे आज मोबाईल जीपीएस, मेडिकल मधील एम आर आय , स्कॅनिंग सुविधा सुलभ झाल्या आहेत. हे सांगताना त्यांनी शास्त्रीय यांत्रिकी ( क्लासिकल मेकॅनिक्स) मध्ये मोठ्या आकाराच्या कणांचा अभ्यास आणि पुंजकिय यांत्रिकी ( क्वान्टम मेकॅनिक्स) मध्ये अती सूक्ष्म कणांचा ( अणू रेणू) चा अभ्यास करण्यात आल्याने भौतिकशास्त्र विकसित झाल्याचे सांगितले. प्रकाश, उर्जा म्हजे सुद्धा एकत्रित असलेले अनेक सूक्ष्म कण आहेत, असे सांगत त्यांनी आयझॅक न्यूटन, जेम्स क्लर्क मॅक्सवेल, मॅक्स प्लॅन्क, अल्बर्ट इंन्स्टेन, डॉ.जगदीशचंद्र बोस आदी शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याची माहिती दिली.
यावेळी खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण, विद्या प्रसारक मंडळ ठाणे चे कार्याध्यक्ष डॉ.विजय बेडेकर, सेक्रेटरी-अभय मराठे, महर्षी परशुराम इंजिनिअरींग महाविद्यालय चे प्राचार्य अविनाश पवार आणि इतर शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.