साटेली-भेडशीच्या नव्या सुसज्ज इमारतीमुळे आरोग्य सेवा अधिक होईल दर्जेदार

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीचं दीपक केसरकर यांनी केलं लोकार्पण | पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती |
Edited by: संदीप देसाई
Published on: February 26, 2023 20:20 PM
views 576  views

दोडामार्ग : अनेक वर्षी लोकांची मागणी असलेलं साटेली भेडशी येथील सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण करत असताना आपल्याला मोठा आनंद होत असून या भागातील रुग्णसेवा अधिक दर्जेदार बनणार असल्याचं प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. आपली तब्येत बरी नसल्याने आपण प्रत्यक्ष जरी या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहू शकत नसलो, तरी आपलं विशेष लक्ष माझा मतदारसंघ व दोडामार्ग तालुक्यावर असून दोडामार्ग तालुक्यातील विविध मोठ्या विकास कामांसाठी शिंदे सरकारच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही काम भूमिपूजनाची वाट न पाहता प्रत्यक्ष सुरू करण्याचे आदेशही आपण प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आपण दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.


दोडामार्ग तालुक्यात नव्याने सुसज्ज बांधलेल्या साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण शनिवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दयानंद कांबळी, तहसीलदार अरुण खानोलकर, डॉ. रमेश करतसकर, डॉ. सारंग, डॉक्टर, तुषार चिपळूणकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आरोग्य अधिकारी कांबळे यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, अड. नीता कविटकर, गोपाळ गवस, शैलेश दळवी, तीलकांचन गवस, माजी सरपंच नामदेव धरणे, संदीप गवस, मायकल लोबो आदींच्या उपस्थितीत फित कापून व नामफलकाचे अनावरण करून रीतसर आरोग्य केंद्र इमारतीचं लोकार्पण केलं. 


त्यांनतर नागरिकांशी सवांद साधताना मंत्री केसरकर यांनी तत्कालीन मंत्री दीपक सावंत यांचे आभार मानले, त्यांनी मंत्री असताना जिल्हयातील तीन सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केली. आमचं पूर्ण लक्ष जिल्हयावर आहे. भूमिपूजनसाठी आम्ही कोणतही काम अडवून ठेवले नाही. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयासाठी 2.19 कोटीचे काम सुरू झाले. तालुका क्रीडांगण 1.19 कोटी, हेवाळे ब्रिज, नगरपंचायत इमारत व नाट्यगृह मंजूर केला आहे, ही सर्व कामे सुरू होतील. जिल्हा नियोजनमधून पालकमत्र्यांनी साडे पाच कोटी मंजूर केलेत. त्यामूळे झालं गेले सर्व विसरून साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र कसं व्यवस्थित चालेल, हे पाहुया, असं आवाहन केलं.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खूप चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात आरोग्य सेवा उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. ग्रामीण भागात डॉक्टर, नर्सेस उपलब्ध असणे आवश्यक आहे. सर्व आरोग्य केंद्र सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार दीपक केसरकर या सर्वांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य केंद्रातर्गत दर्जेदार सेवा देण्यासाठी आपण सरकार म्हणून कटीबद्ध आहोत, या सुसज्ज आरोग्य केंद्रामुळे निश्चितच साटेली भेडशी परीसरात आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार बनेल, असा विश्वास व्यक्त केला.