
दोडामार्ग : गेली कित्येक वर्षे दोडामार्ग तालुक्यात अमली पदार्थांचे राजरोस सेवन केले जात असल्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी सायंकाळी पाटये पुनर्वसन सासोली येथील कालव्यावर चक्क गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना तालुक्यातील दोन युवकांना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. दोडामार्ग तालुक्यात या विकृतीचा पर्दाफाश करण्यासाठी पुढाकर घेणाऱ्या पोलीस निरीक्षक अरुण पवार व त्यांचे टीमने केलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
अमली पदार्थांचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सुद्धा युवाई मोठ्या प्रमाणत अशा अमली पदार्थांच्या विळख्यात फसल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्याप अशा प्रकारची धडक कारवाई होऊन हे चित्र स्पष्ट झालं नव्हतं. मात्र, सोमवारी संध्याकाळी पाटये पुनर्वसन येथील कॅनलवर सोमवारी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास दोन युवक अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची गुप्तवार्ता दोडामार्ग पोलिसांना मिळाली. त्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक अरुण पवार, हवालदार रामचंद्र मळगावकर, पोलीस नाईक विठोबा सावंत यांनी सापळा रचला. अमली पदार्थ सेवनसाठी सऱ्हास वापर होत असलेल्या तिलारीच्या कालव्याकडे या पथकाने धडक मोर्चा नेला.
त्यावेळी या पथकाला सासोली येथे तिलारीच्या कालव्यावर अमित गवस व संदेश नाईक तेथे संशयितरित्या असल्याचे आढळून आले. त्या दोघांची पोलीसांनी झडती घेतली असता त्यांचे कडे गांजा हा अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर त्या दोघांनाही ताब्यात घेत पोलीसांनी पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आनंद नाईक करीत असल्याची माहिती येथील पोलीस ठाण्यातून देण्यात आली.