
सावंतवाडी : माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी. डोंगर कोसळण्याच्या या घटना मागील काही वर्षात कोकणात अनेक भागात घडत आहेत. आजही घडत आहेत. माळीण,तळीये, इर्शाळवाडी या तिन गावांत तर कुटुंबाच्या कुटुंबासह गावही उद्ध्वस्त झालीत. पण, तरीही ना प्रशासन भानावर येतय ना लोक. इर्शाळवाडीतील गुरुवारी घडलेली घटना ही आतातरी जागे व्हा, वेळ गेलेली नाही सुधरा ! असाच धोक्याचा अलर्ट देऊन गेलीय.
कोकणात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर गावातील डोंगर कोसळलून घडलेल्या दुर्घटनानंतर सुदैवानं अस्तित्वात असलेल्या अन् माती खाली गाडल्या गेलेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यापलिकडे अन् श्रद्धांजली अर्पण करण्यापलिकडे दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. दैव नावाची एक गोष्ट सोडून दुसरं काहीही कामी येत नाही. अशा डोंगर कोसळण्याच्या घटना कोकणात मागच्या काही वर्षांत वाढलेल्या दिसतात. काल गुरुवारी रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून घडलेली दुर्घटना त्यातीलच एक आहे. त्यात आतापर्यंत एका चिमुकल्यासह 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 119 लोकांची ओळख पटली असून अजून 109 लोकांचा शोध सुरू आहे. मृत 16 लोकांपैकी 12 जणांची ओळख पटली आहे. तर अद्याप 4 जणांची ओळख पटलेली नाही. 5 लोक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कालपासून अतिशय खडतर परिस्थितीत एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांच रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्तेही मदतीला धावून गेलेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह घटनास्थळी तळ ठोकून होते. या गावात असणारी 40 घरं सर्व दरडीखाली येऊन नेस्तनाबूत झाली आहेत. गावातील लोक झोपेत असतानाच काळानं हा घाला घातल्यानं आज फक्त हळहळ व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही.
2000 सालामध्ये काळसे, येथे डोंगरातली दरड कोसळून अख्ख कुटुंब घरासह त्याखाली गाडले गेले होते. तर गाळेल, शिरशिंगे, फुकेरी यासह सह्याद्री रांगांमधील अनेक ठिकाणी असे प्रकार घडले होते.
याआधी 30 जुलै 2014 रोजी माळीण गावावर पहाटे काळरुपी डोंगर कोसळला अन् होत्याचं नव्हतं झालं होतं. अख्खं माळीण गाव डोंगराखाली गाडलं गेलं होत. आज त्या घटनेलाही 9 वर्ष लोटलीत. या दुर्घटनेत 44 घरं गाडली गेली होती. तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 900 पेक्षा जास्त मुक्या जनावरांचाही यात मृत्यू झाला होता. 22 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यातील तळीये गावात कोसळलेल्या दरडीमुळे गाव उद्ध्वस्त झालं होतं. गावातील 35 घरं मातीखाली गाडली गेली होती. आज 20 जुलै 2023 हीच घटना इर्शाळवाडीत घडली. आजही ना परिस्थिती बदलली, ना सुदैवानं बचावलेल्यांचा भावनांचा फुटलेला हंबरडा थांबला.
14 ऑगस्ट 2019 रोजी सावंतवाडी तालुक्यातील असनिये, झोळंबे गावांत अशीच परिस्थिती ओढावला होती. झोळंबेत डोंगर खचून डोंगरातील माती वस्तीत आली होती.परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणून अनेकांची घर वाचली. कुटुंब उद्ध्वस्त होता होता बचावली. माती खाली गाडला जाणारा एक युवक केवळ बॅटरीच्या प्रकाशानं बचावला होता. गावातील मंदीरात विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलानं त्यांना आधार दिला होता. तर असनियेत भूस्खलन होऊन डोंगर रस्त्यावर आला होता. यामुळे रस्ताच गायब होऊन घारपी गावचा संपर्क तुटला होता. आजही यांसह तालुक्यातील काही भागातील डोंगर धोकादायक स्थितीत आहेत. मुसळधार पावसात ते खाली कोसळण्याची मोठी शक्यता आहे. जुनं, जुलै, ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडताना आढळतात.
तालुक्यातील घाटरस्ते, शहरासह शहरालगतच्या डोंगरांचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. आंबोली घाटात तर दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार वाढत आहेत. अवजड वाहनांची वाहतूक, बुजलेले ब्रिटिशकालीन नाले, पावसापुर्वी न होणारी नाले सफाई अन् पाणी वाहुन जाण्याचे बंद झालेले नैसर्गिक स्त्रोत, हेच यामागचं मुख्य कारण आहे. इतरही घाटमार्ग, डोंगर यांचीही तीच परिस्थिती आहे.
स्फोटामुळे डोंगराला बसणारे हादरे, वाढलेली जंगलतोड, झाडांची लोप पावणारी संख्या, डोंगरात घुसू पाहणारा 'माणूस' यामुळेच अशा घटना कोकणात वाढत आहेत. जे या तिन गावांत झालं ते इथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसं होऊही नये. त्यामुळे यावर शासनानं उपाययोजना करणं, वेळीच सावध होण आवश्यक असताना प्रत्येक सुजाण नागरिकानं निसर्ग जपण्यासाठी पुढाकार घेणही तेवढच आवश्यक आहे. अन्यथा माळीण, तळीये, इर्शाळवाडीच्या यादीत कधी आपलं व आपल्या वाडीचं नाव जोडलं जाईल हे सांगता येणार नाही. 'डोंगर ढासळतोय, माणूस कोसळतोय !' अशा या परिस्थितीत शासनासह प्रत्येकान जागं होणं, निसर्ग जपणं काळाची गरज बनली आहे. अन्यथा श्रद्धांजली वाहून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे हाती दुसरं काहीही शिल्लक राहणार नाही.