कुणबी गौरव सोहळ्यात समाजातील गुणवंतांचा गौरव

Edited by: मनोज पवार
Published on: August 07, 2025 16:12 PM
views 78  views

मंडणगड :  विद्यार्थ्यांनी माहीती पुर्ण आणि अभ्यासपुर्ण क्षेत्र निवड करुन त्यामध्ये यश संपादीत करावे व त्या क्षेत्रात आपल्य कर्तृत्वाचा ठसा उमटवावा त्यातून आई वडील व कुटुंबासह तालुक्याची मान सदैव उंचावत राहील असे कार्य करावे असे प्रतिपादन निवृत्त पोलीस अधिकारी रमेश घडवले यांनी केले.

मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ तालुका मंडणगड मुंबई विभाग यांच्यावतीने 3 ऑगस्ट 2025 रोजी कुणबी समाजातील दहावी, बारावी, पदवी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादीत केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मुंबई नालासोपारा येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना घडवले पुढे म्हणाले, 'जीवनातील विविध क्षेत्रात यशाची उंच शिखरे गाठात असताना आपल्या समाजाचा विसर पडू देवू नका, स्पर्धा परिक्षांचे माध्यमातून शासकीय सेवेत अधिकारी बनून समाजाची व देशाची सेवा करा',  स्पर्धा परिक्षांची तयारी कऱण्यासाठी विद्यार्थ्यांना शक्य ते सर्व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी यावेळी आश्वासीत केले. मंडणगड तालुका कुणबी संघाचे माध्यमातून मंडणगड व मुंबई येथे गेल्या चौसष्ठ वर्षापासून या सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. तालुक्यातील कुणबी समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंताना प्रोत्साहन देण्यात येते. विविध वक्त्यांचे मार्गदर्शनातून युवा शक्तिस विधायक मार्गाने दिशा देण्याचे कार्य करण्यात येत आहे. सत्कार सोहळ्यात, गुणवंत विद्यार्थ्यांसह, डॉक्टर, वकील, सी.एस, उच्च विद्याविभूषीत स्कॉलर विद्यार्थी व खेळाडू यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाचे उद्देश सफल झाल्याचे याचबरोबर पुढील आयुष्यात चांगले कार्य करण्यासाठी कार्यक्रमामुळे प्रेरणा मिळालेली असल्याचे सांगीतले. जे.जे. रुग्णालय मुंबई येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून सेवानिवृत्त झालेले रघूनाथ महादेव पोस्टुरे यांचा सेवा संघाचेवतीने विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे निमीत्ताने विविध क्षेत्रात उत्तर कामगीरी केलेल्या समाजातील 250 गुणवंताचा प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास समाजनेते भाईसाहेब पोस्टुरे, रमेश घडवले, मनोज घागरूम, रघूनाथ पोस्टुरे, विजय ऐनेकर, सचिन माळी, मुरलीधर बैकर, मारुती पालणकर, सुनिल शिगवण, शंकर बांडल, विजय घरटकर, अनंत काप, हेमंत शिगवण, श्रीमती अस्मिता बैकर, सौ. अनिता डेरे, सौ. पुष्पा राठोड/ बेर्डे, सौ. राजेश्री घागरुम, सुरेश भवणे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील दानशुर व्यक्तीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. संपुर्ण कार्यकारिणीने कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी विशेष प्रयत्न केले.