शहिद लक्ष्मण गवस यांचं स्मारक युवकांसाठी ठरेल प्रेरणा

तेरवण येथे शहीद स्मारकाचे लोकार्पण
Edited by: संदीप देसाई
Published on: May 13, 2023 09:37 AM
views 146  views

दोडामार्ग : तेरवण गावातील शहीद लक्ष्मण गोपाळ गवस यांच स्मारक गावासह पंचक्रोशीतील युवकांना प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार काढत सैनिक परंपरा असलेल्या तेरवण गावच्या विकासाचा बॅकलॉग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भरून काढण्यात येईल, असा शब्द भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तेरवणवासीयांना दिला. तेरवण येथील शहीद गोपाळ गवस यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या स्मारकाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते. मात्र, चव्हाण यांना तातडीने नागपूर येथे जावे लागल्याने यांनी आपले प्रतिनिधी सदस्य म्हणून त्यांनी तेली यांना पाठवले.


यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, महादेव वांद्रे, सरपंच सोनाली गवस,  शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख संजय गवस, संदीप धर्णे, सदस्य चंदू मळीक, वीरपत्नी भागीरथी गवस, सेवानिवृत्त कॅप्टन कृष्णा गवस, नितीन पाटील, चंद्रकांत गवस यांच्यासह इसापूर, वाघोत्रे, मिरवेल, नामखोल, मेढे गावातील ग्रामस्थ तसेच दशक्रोशीतील आजी-माजी सैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


तेली पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग सीमा जोडणारे सर्व घाटरस्ते येत्या वर्षभरात जोडण्याचा मानस मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. त्याच धर्तीवर तेरवणच्या नियोजित घाटरस्त्याचे काम हाती घेऊन पूर्णत्वास नेण्यात येईल काम सुरू झाल्यानंतर ते करून घेण्याची जबाबदारी ही येथील स्थानिक ग्रामस्थांची आहे. स्मारकामुळे येथील युवावर्ग तसेच या परिसरात येणारे पर्यटक प्रेरणा घेतील, असे ते म्हणाले.


गावचे नाव उज्ज्वल केलेल्या शहीद लक्ष्मण  घ्यावे तेरवण गावात उभारलेल्या शहीद शहीद स्मारक समिती, तेरवण यांच्याकडून गवस यांचे स्मारक एकजुटीने उभारले. दशक्रोशीतील आजी-माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा यावेळी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काही माजी सैनिकांनी भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला.


अध्यक्षस्थानावरून बोलताना महादेव वांद्रे यांनी तेरवण येथील लक्ष्मण गोपाळ गवस शहीद स्मारक समिती, ग्रामस्थ देणगीदारांचे आभार व्यक्त केले. यावेळी एकनाथ नाडकर्णी, नितीन पाटील, बाबुराव धुरी संजू परब आदींनी मनोगत व्यक्त केले. स्मारक लोकार्पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद स्मारक इमारतीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन तेली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

 

लक्ष्मण गोपाळ गवस यांना १९७१ च्या भारत-पाक युद्धात वीरमरण आले होते. मात्र, त्यावेळी तेरवणवासीयांना त्यांचे स्मारक उभारणे शक्य झाले नाही, परंतु ही उणीव तब्बल ५२ वर्षांनंतर तेरवणवासीयांना भरून काढली. शहीद स्मारक समिती स्थापन करून निधी संकलन करत देशासाठी बलिदान दिलेल्या आपल्या गावच्या विर पुत्राचा सन्मान तेरवण वासियांनी केला.