
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत घवघवीत यश मिळवले आहे. विरोधी पक्ष व अपक्ष उमेदवारांना मागे टाकत महायुतीच्या उमेदवारांनी सर्वच गटांत आघाडी घेतली. निकाल जाहीर होताच महायुतीने जल्लोष करत डीजेच्या तालावर भव्य विजय मिरवणूक काढली. संपूर्ण तहसील कार्यालयच्या बाहेर गुलाल उधळून संपूर्ण परिसर गुलालमय झाले होते.
सोमवारी सकाळी १० वाजता येथील मुख्यालयाच्या इमारती मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला. तसेच रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात आला.
माटणे गट भाजपाचा बालेकिल्ला
तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या माटणे मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. या गटातून भाजपाचे रामा गवस, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व या मतदारसंघातून मागील दोन टर्म भाजपातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले व एकदा पं.स.वर निवडून गेलेले मात्र यावेळी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजेंद्र म्हापसेकर यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. ही लढत अतिशय चुरशीची व रंगतदार होईल असा अंदाज वर्तविला जाऊ लागला. मात्र मतमोजणीवेळी भाजपाचे रामा गवस यांनी सर्वच मतदान केंद्रावर निर्विवाद वर्चस्व मिळवत या गटातून १६९७ मताधिक्यांनी विजयी झाले.
साटेली -भेडशी गटात ठाकरे शिवसेना उध्वस्त !
साटेली -भेडशी गटातून भाजपाच्या उमेदवार श्वेता धर्णे व ठाकरे शिवसेनेच्या सुनंदा धर्णे यांच्यात लढत झाली. ही लढतही चुरशीची होईल असा अंदाज होता. मात्र मतमोजणीच्या वेळी श्वेता धर्णे यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत ३४३९ मतांचे लीड घेऊन अगदी सहज विजय संपादन केला. त्यांचे हे मताधिक्य तालुक्यातील सर्वाधिक झाले आहे.
मणेरी गणात बाबुराव धुरींच्या पत्नीचा पराभव
मणेरी गटातून शिंदे शिवसेनेच्या साक्षी तळवडेकर व अपक्ष उमेदवार सुनिता भिसे यांच्यात तर मणेरी गणातून सोनिया कुबल व ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या पत्नी प्रीती धुरी यांच्यात अटीतटीची लढत रंगली. मात्र साक्षी तळवडेकर यांनी १०६५ मतांचे मताधिक्य घेत विजयी झाल्या. तर प्रीती धुरी व सोनिया कुबल यांच्यात झालेल्या रंगतदार लढतीत सोनिया कुबल यांनी २१७ मताधिक्य घेत विजय मिळविला.
भव्य मिरवणूकीने साजरा केला विजयोत्सव
निकाल जाहीर होताच महायुतीच्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला. विजयी उमेदवार अधिकृत विजयी प्रमाणपत्रासाठी मतमोजणी कक्षात होते. यावेळी गेटबाहेर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रमाणपत्र वाटप झाल्यानंतर युतीचे विजयी उमेदवार बाहेर आले अन् गेटबाहेर असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयाचा गुलाल उधळला. यावेळी विजयी उमेदवारांना उचलून घेतले. त्यानंतर विजयी उमेदवारांची डीजेच्या तालावर शहरातून भव्य मिरवणूक काढली. ही मिरवणूक गावागावातून काढण्यात आली.
मणेरीतील उमेदवारनिहाय मते
मणेरी जिल्हा परिषद गटातून साक्षी विशांत तळवडेकर (शिंदे शिवसेना) ३४५५ मतांनी विजयी झाल्या असून ललिता लक्ष्मण ताटे (ठाकरे शिवसेना) १४०८ मते, सुनिता कमलाकर भिसे (अपक्ष) २३९० व नोटा २५४ मते मिळाली. कोलझर पंचायत समिती गणातून गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना) हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर मणेरी गणातून सोनिया विश्राम कुबल (भाजपा) १४८८ विजयी झाल्या असून दीपक बुधाजी जाधव (बहुजन समाज पार्टी) ९४, प्रीती बाबुराव धुरी (ठाकरे शिवसेना) १२७१, संजय तुकाराम देसाई (अपक्ष) १२१, प्रवीण पांडुरंग गवस (अपक्ष) ५६५, अनिरुद्ध अविनाश फाटक (अपक्ष) २५८ व नोटा १०९ मते मिळाली.
साटेली-भेडशी मतदारनिहाय मते
साटेली भेडशी जिल्हा परिषद गटातून श्वेता सूर्यकांत धर्णे (भाजपा) ५३१२ विजयी झाल्या असून सुनंदा सुधाकर धर्णे (ठाकरे शिवसेना) १८७३ व नोटा ४४६ मते मिळाली. कोनाळ पं.स. गणातून सायली स्वप्नील निंबाळकर (शिंदे शिवसेना) २०२१ विजयी झाल्या असून सोनाली सुनील गवस (ठाकरे शिवसेना) ४१८, साक्षी संदीप देसाई (अपक्ष) १०७१ व नोटा १५७ मिळाली. साटेली भेडशी पं.स. गणातून संजय पांडुरंग सातार्डेकर (भाजपा) १७८४ विजयी झाल्या असून सिद्धेश गुरुनाथ कासार (ठाकरे शिवसेना) ९१२, संदीप मोगरा नाईक (राष्ट्रीय काँग्रेस) १७०, गंगाराम जानू कोळेकर (अपक्ष) ९८७ व नोटा १११ मते मिळाली.
माटणे मतदारनिहाय मते
माटणे जि.प. गटातून भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष रामा दशरथ गवस (भाजपा) ३७८८ विजयी झाले असून राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (अपक्ष) २०९१, बाबुराव दत्ताराम धुरी (ठाकरे शिवसेना)१३९०, प्रकाश लक्ष्मण कांबळे (आरपीआय -आठवले गट) १२३, लक्ष्मण दशरथ गवस (अपक्ष) ३४४ व नोटा १४५ मते मिळाली. झरेबांबर पं.स. गणातून स्नेहा संजय गवस (शिंदे शिवसेना) २५५४ विजयी झाल्या असून विनिता विष्णू घाडी (ठाकरे शिवसेना) ७५५, वृषाली प्रकाश गवस (अपक्ष) १२६३ व नोटा १९४ मते मिळाली. माटणे पं.स. गणातून पार्वती महादेव गवस (भाजपा) १५५९ विजयी झाल्या असून प्रिया तुषार नाईक (ठाकरे शिवसेना) ८२६, सुप्रिया शैलेश नाईक (अपक्ष) ५८४ व नोटा १४६ मते मिळाली.
सरकारी कर्मचारी बाहेर ताटकळत !
तालुका मुख्यालय इमारतीत अनेक शासकीय कार्यालये आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी पोलिसांकडे देत त्या यादीव्यतिरिक्त इतर कोणालाही आत न सोडण्याचे आदेश देण्यात आले. अनेक शासकीय कर्मचारी गेटवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची नावे तपासली. मात्र ती यादीत नसल्याने अनेकांना गेट बाहेरच ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे प्रशासनाच्या या अजब-गजब काराभाराविरोधात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.










