सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा लूक बदलणार ! | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन भूमिपूजन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष प्रयत्न ; सर्वाधिक निधी सावंतवाडीला !
Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 14:46 PM
views 410  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक असणाऱ्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा लूक बदलणार आहे. रेल्वे स्थानकास जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व स्थानकाच सुशोभीकरण केलं जाणार आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टचा लुक हा या रेल्वे स्थानकास प्राप्त होणार असून सर्वाधिक निधी हा सावंतावाडी स्थानकाला सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून देण्यात आला आहे. सावंतवाडीसह कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ स्थानकाचंही रूपडं पालटणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या गुड न्यूजमुळे तळकोकणातून लोकप्रतिनिधींचे आभार मानत या निर्णयाचं स्वागत केल जात आहे. 

रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन ४२ वर्षांपूर्वी १ मे १९८१ ला सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. तर कोकण रेल्वे वाहतूक सर्वसाधारणपणे २५ वर्षांपूर्वी १९९८ पासून सुरु आहे. याच दरम्यान सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आला. यावेळी कोकण रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे अनेक वर्ष न झाल्याने रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रवाशांना याच मार्गावरुन ये-जा करावी लागत आहे. यामुळे राज्यातील रेल्वे स्थानकांना जोडणारा रस्ता सुशोभित व चांगल्या दर्जाचा असावा तसेच रेल्वे स्थानक परीसर अधिक दर्जेदार करण्यात याव्यात अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या स्थानकांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक ६ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी हा सावंतावाडीसाठी मंजूर करण्यात आला आहे. यात रस्त्याचे काँक्रिटीकरण, फुटपाथ, आर सी सी गटर, संरक्षक भिंत, प्रवेश द्वार कमान, बस थांबा, रिक्षा थांबा, बागकाम व इतर सुशोभीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

चार रेल्वे स्थानकाना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याच्या कामांचा मार्च अर्थसंकल्प २०२३ मध्ये समावेश करण्यात आला असून त्यांच्या भूमिपूजनाचा सोहळा उद्या मंगळवारी संपन्न होणार आहे. यामुळे भविष्यात कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ व सावंतवाडी ही स्थानकांना एअरपोर्टचा लूक येणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हे शक्य होत आहे. हे काम महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. उद्या या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते ८ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री खा‌. नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक तसेच जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड व वैभववाडी उपविभाग अधीक्षक विनायक जोशी यांनी केले आहे.