
सावंतवाडी : 'माझे गाव देशावर. पण, शालेय जीवनात अनेक पुस्तके वाचताना मी जयवंत दळवींचे साहित्य वाचल्याने मला कोकणात यावे,' असे वाटू लागले. नियतीने माझी ती इच्छा पूर्ण केली. गेली १७ वर्षे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दळवी यांच्या आरवली गावाजवळच राहत असून, हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन उपक्रमशील शिक्षक ईश्वर थडके यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव वाचनालयात आयोजित साहित्य कट्ट्यावर ते बोलत होते. निमित्त होते, साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या २४ व्या सभेचे.
'माझा आवडता लेखक व त्यांची साहित्य संपदा' विषयावर बोलताना ते साहित्यिक जयवंत दळवींविषयी बोलले. दळवींनी अनेक विषयावर पुस्तके लिहिली; परंतु काहीजण अश्लीलतेचा शिक्का त्यांच्यावर मारतात, ते मला योग्य वाटत नाही. त्यांची विविध विषयांवरील पुस्तके वाचताना मला त्यांचा 'रुक्मिणी' हा कथासंग्रह भावला. 'सूर्यास्त' हे नाटकही आवडले. 'सारे प्रवासी घडीचे' हा तर साहित्यातील मानबिंदू आहे, असेही ते म्हणाले. सभेच्या सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी स्वागत केले.
प्रास्ताविकात त्यांनी कट्ट्याचा उद्देश विशद करून ईश्वर थडके यांचा परिचय करून दिला. थडके यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे व सचिन दळवी यांनी त्यांना प्रश्न विचारले व चर्चेत भाग घेतला. पाऊस व गडगडाट अशा समस्या असूनही ही सभा वेळेत व नियमांनुसार पार पडली. सभेसाठी अनिता सौदागर, प्रिया आजगावकर, रश्मी आजगावकर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.