झाराप शाळेच्या पालकांनी छेडलेले उपोषण अखेर मागे !

सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 12, 2023 13:19 PM
views 157  views

कुडाळ : झाराप जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक एक येथे चौथा शिक्षक देण्यास शिक्षण विभागाने समर्थता दर्शवली असल्याने येथील पालकांनी अखेर शाळा बंद आंदोलन बुधवारपासून मागे घेतले आहे. यानंतर आता पालक गुरूवार पासून मुलांना शाळेत पाठविण्यात येणार आहे. आता या शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून या शिक्षकांचे वेतन शासन देणार आहे.

      झाराप येथील शाळेत एकच शिक्षक कार्यरत असल्याने मुलांची गैरसोय होत होती. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे पालकांनी सोमवार पासून शाळा बंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने एक शिक्षक नियुक्त केला होता. तसे लेखी पत्र दिले होते. यानंतर हे शिक्षक बुधवार शाळेत हजर झाले आहेत. लेखी पत्र देऊनही जोपर्यंत चौथा शिक्षक नियुक्त करण्यात येत नाही तोपर्यंत आपण आपले शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पालकांनी केला होता. यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नव्हते. सलग तीन दिवस शाळा बंद राहूनही शिक्षण विभागाने एकाच शिक्षकावर पालकांची बोळवण केली आहे. त्यामुळे पालकांनी ही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सद्यस्थितीत शिक्षण विभागाकडे आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने शासन आदेशानुसार मंजुर पदांएवढे शिक्षक न देता येणे ही मोठी शिक्षण विभागाची शोकांतिकाच आहे असा आरोप पालकांनी यानिमित्ताने केला आहे. आता शिक्षण विभागाच्या धोरणानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती या शाळेत करण्यात येणार आहे. या सेवा निवृत्त शिक्षकांचे वेतन शिक्षण विभाग देणार आहे. त्यामुळे आता पालकच सेवानिवृत्त शिक्षकांच्या शोधाला लागले आहेत. शिक्षणमंत्री यांच्याच जिल्ह्यात शाळांची शिक्षकांअभावी होत असलेली परवड खेदजनक असल्याचा आरोप पालकांनी यानिमित्ताने केला आहे. शिक्षण विभागाने या प्रमाणेच ईतर शाळांकडेही लक्ष देऊन शाळेत योग्य त्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र खासगीकरणासाठी कडेलोट करू नये अशीही मागणी यानिमित्ताने पालकांनी केली आहे.