महसूलचे 'वरातीमागून घोडे' | वाळू उत्खननविरोधातली मोहीम ठरली 'फार्स' !

तेरेखोलच्या पात्रात सापडली केवळ अर्धा ब्रास वाळू, बुट्टी, फावडे व आठ रिकाम्या पिशव्या
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 16, 2022 21:10 PM
views 172  views

बांदा : तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे विनापरवाना वाळू उत्खनन विरोधात महसूल विभागाने कडक मोहीम घेतली. शनिवारी सायंकाळी महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्रात जाऊन धाड टाकली मात्र ही धाड म्हणजे वराती मागून घोडे असल्याचे उघड झाले आहे. कारण या कारवाईत केवळ अर्धा ब्रास रेती, एक फावडे व एक बुट्टी नदी किनारी आढळून आली तर मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे  पथकाच्या निदर्शनास आले. मात्र रॉयल्टी बुडवून वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियावर यापुढे अशीच कारवाई करणार की फक्त कारवाईचा फार्स होता, असा सवाल स्थानिकातुन विचारला जात आहे.

       याबाबत महसूल विभागाने दिलेली माहिती अशी की, शेर्ले येथे तेरेखोल नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळु उत्खनन होत असल्याचे तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार महसूल विभागाने बांदा महसूल मंडळ अधिकारी आर वाय राणे, आजगाव महसूल मंडळ अधिकारी विराज कोदे, शेर्ले तलाठी कवीटकर, कोतवाल विनोद धुरी , शेर्ले पोलीस पाटील जाधव आदी सह पथक शेर्ले नदीपात्रात दाखल झाले. पाहणी केली असता त्यात केवळ अर्धा ब्रास वाळू, एक बुट्टी, एक फावडे व आठ रिकामी पिशव्या आढळून आल्या. तर सदर ठिकाणी एकही वाळू उत्खनन करताना आढळून आला नाही.तर अन्य एक ठिकाणी शेर्ले येथे तीन ब्रास वाळूचा साठा आढळून आला सदर साठा शेटकर यांचा असल्याचे बांदा मंडळ अधिकारी आर वाय राणे यांनी सांगितले असून सदर सापडलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून आपण ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल तहसीलदार कार्यालय येथे पाठवणार असून त्यानंतर दंड ठोठावण्यात येईल .

विनापरवाना वाळू उत्खनन करणाऱ्या विरोधात महसूल विभागाने केलेली कारवाई म्हणजे केवळ देखावा असल्याचे बोलले जात आहे. बांदा महसूल मंडळ कार्यालय व शेर्ले तलाठी कार्यालय येथून जवळच हे नदीपात्र आहे. मात्र असे असतानाही येथे कोणाच्या आशीर्वादाने वाळू उत्खनन केली जाते याचा तपास होणे गरजेचे आहे. तशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे