
सावंतवाडी : नगरपरिषद कार्यालयासमोर गेले अनेक दिवस फुटपाथवर असलेला एक मोठा व धोकादायक खड्डा 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या कार्यकर्त्यांनी सिमेंट काँक्रिटच्या सहाय्याने बुजवून नागरिकांची मोठी सोय केली आहे. या खड्ड्यामुळे झालेले अपघात आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन संस्थेने रात्री उशिरा हा उपक्रम राबवला.
नगरपरिषद समोरील ज्या फुटपाथवर ट्रॅफिक पोलीस उभे असतात, त्या ठिकाणी हा खड्डा होता. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खड्ड्यामुळे काही दिवसांपूर्वी तीन अपघातही झाले होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
या धोकादायक खड्ड्याची माहिती मिळताच, सुशील चौगुले (सावंतवाडी तालुका शहर प्रमुख माहिती अधिकारी व पोलीस मित्र), सुमित (आबा) पिरणकर, मयूर सावंत, मनोज गुंजाळ, आणि सुनील नाईक यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव यांना विनंती केली. या विनंतीची दखल घेऊन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री एकच्या सुमारास हा खड्डा सिमेंट काँक्रिटने बुजवून रस्ता सुरक्षित केला.
एवढेच नव्हे, तर तीन मुशीकडील हॉस्पिटलच्या मार्गावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळेही नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. आठ दिवसांपूर्वी याच खड्ड्यात मोटरसायकल आदळून एका चालकाचा शॉकप्सर तुटला आणि तो रस्त्यावर पडला होता; सुदैवाने त्याचा जीव वाचला. याचीही गंभीर दखल घेऊन 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'ने तोही खड्डा तात्काळ बुजवला.
या सेवाभावी कार्यात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, माहिती अधिकारी सुशील चौगुले आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरोजकर यांनी सक्रिय सहकार्य केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजसेवेच्या भावनेतून केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.











