
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील अनेक गंभीर समस्यांबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. मंत्र्यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेत डॉक्टरांची सोय, वेतन इतर मुद्द्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे वचन दिले. तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला त्यांनी केल्या.
उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत व डॉक्टर मिळावे यासाठी सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून आंदोलन छेडलं होत. यावेळी आरोग्यमंत्री यांच्यासह सर्व आरोग्य विभाग अधिकारी यांच्या बैठकीच आश्वासन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांनी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घडवून दिली. यावेळी मंत्री श्री. आबिटकर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा, फिजीशीयन, न्युरोलॉजीस्ट, हृदयरोग तज्ञ उपलब्ध करून देण्याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी वेधले. तसेच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी रिक्तपद, रूग्णालयातील इतर सुविधांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा यावेळी दोन्ही संघटनांकडून देण्यात आला. यावेळी मंत्री श्री. आबिटकर यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. या समस्या निश्चित सुटतील असे वचन दिले. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर, संकल्प धारगळकर, प्रथमेश प्रभू, संदीप निवळे आदी उपस्थित होते.