
सिंधुदुर्ग : जिल्हा महिला व बाल रुग्णालयाकडे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन व विविध प्रश्नांबाबत मनसेने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भीक मांगो आंदोलन करून इशारा उपसंचालक आरोग्यसेवा कोल्हापूर यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर थकीत पाच महिन्यांपैकी तीन महिन्यांचे वेतन पुरवठादार कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव काळात अदा केले. उर्वरित वेतन पंधरा दिवसांच्या आत देण्याचे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अतिरिक्त आरोग्य उपसंचालक कोल्हापूर मंडळ सतीश सूर्यवंशी, सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी आयरे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जोशी, रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ वालावलकर आणि मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,बाबल गावडे,रस्ते साधन सुविधा व आस्थापना सेलचे संघटक अमोल जंगले, वैभव धुरी, रामा सावंत आदी पदाधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित होते.
मनसेच्या माध्यमातून रुग्णालयाकडील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व अनियमितता आक्रमकपणे मांडण्यात आल्या व त्यावर तोडगा निघण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चाही घडवून आणली. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ई एस आय सी व भविष्य निर्वाह निधी यासारख्या कामगार सुविधांचा लाभ देयकातून अतिरिक्त होणारी वजावट आदी बाबी पुराव्यांनीशी समोर आणुन मनसेच्या प्रसाद गावडेंनी पुरवठादार कंपन्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दापाश केला. सहाय्यक कामगार आयुक्त श्री आयरे यांनी कामगार कायद्यातील विविध तरतुदी सांगून कामगारांच्या सुविधांबाबत योग्य कार्यवाहीच्या सूचना दिल्या व कर्मचाऱ्यांना वेतन स्लिप देण्याचे निर्देश दिले.
अतिरिक्त आरोग्य उपसंचालक श्री सूर्यवंशी यांनी पंधरा दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वजावट केलेली रक्कम व कामगार सुविधांबाबतची भरणा न केलेली रक्कम ठेकेदाराच्या चालू देयकातून वसूल करण्याचे आदेश वैद्यकीय अधिक्षकांना दिले व यापुढील काळात कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन अदा न झाल्यास ठेका रद्द करण्याच्या सूचना दिल्या. 15 दिवसांनंतर पुनःश्च आढावा बैठक घेण्याचे ठरवण्यात आले असून मनसे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले.