
कणकवली : जिल्ह्यातील हायवेसह सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डे बुजविण्याची पालकमंत्री नितेश राणेंनी घोषणा केली. मात्र, बिले प्रलंबित असल्याने ठेकेदार खड्डे बुजविण्याचे काम करतील का, असाही प्रश्न आहे. परिणामी यावेळी देखील गणरायांना खड्डेमय रस्त्यांवरूनच आणावे लागणार आहे. तर सरकातर्फे फक्त घोषणाबाजी सुरु असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, यापूर्वी आनंदाचा शिधा दिवाळी, गणेश चतुर्थीपूर्वी वाटला जात होता. मात्र, यावेळी तो अद्यापही वाटण्यात आलेला नाही. जिल्ह्यात ठेकेदारांची ८०० कोटींची बिले प्रलंबित आहेत. उबाठा शिवसेनेतर्फे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आंदोलन केले गेले, त्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे यांनी खड्डे बुजविण्याची घोषणा केली. मात्र, हे खड्डे कशाने बुजविणार? लचकरच गणोशोत्सव येत असून या खड्डेमय रस्त्यांवरूनच गणरायांना आणावे लागणार आहे. राज्याचे बांधकाममंत्री शिवेंद्रमराजे भोसले हायवेची पाहणी करण्यासाठी येत आहेत. ही जनतेच्या डोळ्यांत फक्त धुळफेक आहे. यापूर्वीचे चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण हे सर्व बांधकाममंत्री यापूर्वी सुद्धा असेच रस्त्यांवरून फिरून गेले. वास्तविक रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदारांकडे असते. पण, त्यांच्या कामाचे ऑडिट आतापर्यंत कोणत्याच मंत्र्याने केलेले नाही. मुख्य म्हणजे बिले मिळत नसल्याने हे खड्डे ठेकेदारही बुजवू शकणार नाहीत.
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी हायवे देखील खड्डेमय आहे. तर हे खड्डे पवर ब्लॉकने बुजविले जातायत, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसाठी ८७ डॉक्टर दाखल झाल्याची पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली. वास्तविक हे सर्व डॉक्टर शिकावू आहेत. तर आजही ओरोस जिल्हा रुग्णालयातून गोवा - बांबोळी येथे रुग्ण हलविले जात आहेत. पालकमंत्री नीतेश राणे यांनी जनतेच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात मटका, जुगार, गोवा बनावट दारूची विक्री जोरात सुरु आहे. हे धंदे सत्ताधारी पक्षाचीच मंडळी करत असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे दिसून येत असल्याचेही उपरकर म्हणाले.