सरकार भाजपा-सेना युतीचे ! कोट्यवधी निधीवर एकट्या शिवसेनेने अधिकार गाजवू नये ; भाजपचे सुधीर दळवी आक्रमक !

दीपक केसरकर यांनी पूर्वी दिलेल्या आश्वानांचे पुढे काय झाले?
Edited by: संदीप देसाई
Published on: March 19, 2023 15:00 PM
views 212  views

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्यात भाजप व शिवसेना युतीचे सरकार आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या अर्थ संकल्पात जाहीर झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील विविध विकासकामांच्या निधीचे श्रेय एकट्या शिवसेनेने घेऊन जनतेची दिशाभूल करू नये, असा रोखठोक इशारा दोडामार्ग तालुका भाजपा अध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिला आहे. इतकंच नव्हे तर अर्थसंकल्प सादर करणारे आणि या मतदार संघात विकासकामांना चालना देणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्यावरसुद्धा जोरदार टीका केलीय.

याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलंय की,  दोडामार्ग तालुक्यातील विविध विकासकामांना, रस्त्याना युती सरकारने अर्थसंकल्प म्हणजेच बजेट मधून हा निधी दिलेला आहे. हा निधी या जिल्हाचे सुपुत्र राज्याचे बांधकाम मंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वामुळेच मिळालेला आहे. त्यामुळे दीपक केसरकरांचे नाव पुढे करून शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये. गणेशप्रसाद गवस राज्यसरकार हे युतीचे आहे, हे विसरले आहेत. भाजप शिवसेना युतीचे सरकार येऊन सहा ते सात महिने झाले. या कालावधीमध्ये  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कामाची झलक दाखवून दिली. आमदार केसरकर व माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास कामाचा निधी अडकून ठेवलेला होता व विकास कामे ठप्प होती, त्या कामाना चालना देण्याचे तसेच निधी उपलब्ध करून देण्याचे काम मंत्री चव्हाण यांनी केले आहे. आज दोडामार्गच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये विकासाची गंगा सुरु झालेली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय या जिल्हाचे सुपुत्र व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाच आहे.

 जे दीपक केसरकर यांना त्यांच्या १३ वर्षाच्या कालावधीमध्ये जमलं नाही, ते पालकमंत्री चव्हाण यांनी करून दाखवलं. आणि म्हणूनच केसरकर यांच्या समर्थकाला पोटशूळ आलेली आहे. दीपक केसरकर यांनी यापूर्वी दोडामार्ग तालुक्यात अनेक विकास कामांच्या मोठ मोठ्या घोषणा केल्या. त्या त्यांना का नाही पूर्ण करता आल्या? केसरकरांना विकास कामावर एवढा निधी आणण्याची धमक आहे, तर आपल्या १३ वर्षाच्या कालावधीमध्ये दिलेली आश्वासने ते का पुरे करू शकले नाहीत.? असा सवाल उपस्थित करत गणेशप्रसाद गवस यांना त्यांनी दिलेली आश्वासने तरी आठवतात का नाही? तर मी ती आश्वासने आठवण करून देतो. उगाच खोटारडेपणा करू नका, हे युतीचे सरकार आहे. चांगल्या प्रकारे काम चालू आहे, त्याला गालबोट लावण्याचा आतातयीपणा करू नये, असे सांगत गवस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

 दीपक केसरकर अर्थमंत्री, पालकमंत्री होते. त्या कालावधीमध्ये रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, त्यामुळे जनतेने केलेली आंदोलने तपासावीत आणि त्या कालावधीमध्ये किती निधी मंजूर करून आणला ते जाहीर करावे व नंतरच आताच्या श्रेयासाठी पुढे यावे. उगाच जनतेची दिशाभूल करू नये. विकास निधीचा गवगवा करणा-यानी भाजप शिवसेनेची युती असताना व आता सात महिन्याच्या कालावधीमध्ये विकास कामे सूचविताना केसरकरांनी भाजपच्या पदाधिकारी यांना विश्वासात घेतले का? आतापर्यंत किती विकास निधी भाजप कार्यकर्त्यांना दिला तेही जाहीर करावे. यापेक्षा आमच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी किती पारदर्शता ठेऊन विकास निधी दिला, हे आम्ही जाहीर करू, असे भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी स्पष्ट केले आहे.



त्या आश्वासनांचे काय?

तिलारीत अम्युझमेंट पार्कचा गाजर, एमटीडीसी अंतर्गत तेरवण मेढे येथे पर्यटन स्थळ विकसित करणे, तिलारीच्या वसाहतीत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ मार्फत विकास करणे, मांगेली पर्यटन स्थळ विकसित करणे, दोडामार्ग बांदा राज्यमार्ग रुंदीकरण अशी दाखवलेली गाजर कुठे हवेत विरली? याचा केसरकर यांच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी अभ्यास करावा. जे युती सराकरन केलं ते तरी निदान मान्य करावं, असा जोरदार हल्लाबोल सुधीर दळवी यांनी केला आहे.