
मंत्री नितेश राणेंचं प्रतिपादन
सिंधुदुर्गनगरी : माझ्या कारकिर्दीत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवून साध्य करण्यावर माझा भर आहे. सिंधुदुर्गवासियांसाठी नारायण राणेंनी पाहिलेली सगळी स्वप्नं पूर्ण करण हे आमचं धेय्य आहे. माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करुन निर्णय घेत पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासह, त्याच्या दर्जावर माझं लक्ष असणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे या आदर्श प्रकल्पाच्या शुभारंभाला येतील, पत्रकारांना हक्काची घरं मिळावी या उद्देशाने होणारा हा प्रकल्प आहे, असे प्रतिपादन मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित पत्रकार स्नेहसंमेलन २०२६ व पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन आज झाले आहे. पत्रकारांच्या अपेक्षा देखील पूर्ण करण्यासाठी माझा भर राहील. राजकीय इच्छाशक्ती व माणूसकीच्या दृष्टीकोनातून आजवरचा प्रवास केला आहे. आजच्या या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. राजकीय दृष्टिकोनातून मी या गोष्टी करत नाही. मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांचे आशीर्वाद घेताना त्यांनी काही सल्ले दिले, सुचना केल्यात. कारभार करताना, निर्णय घेताना जिल्ह्यातील लोकांचा विचार करण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यामुळेच आजचा हा प्रकल्प होत आहे. आई-वडीलांच्या पुण्याईमुळे माझ्या कारकिर्दीत हा प्रकल्प होतोय. नारायण राणेंनी अनेक कुटुंबांना उभं केल, हक्काच घर दिलं. त्यांच्या मार्गावरच चालण्याचा काम आम्ही करत आहोत. मी विरोधी पक्षात जास्त काळ राहिलेला लोकप्रतिनिधी असून सत्तेत असताना त्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. पालकमंत्री असेपर्यंत जिल्ह्याला केवळ देण्याचं काम केलं जाईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीषा दळवी, जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख , जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, गृह निर्माण सोसायटीचे अध्यक्ष संतोष राऊळ आदींसह ज्येष्ठ पत्रकार, राजकीय पदाधिकारी आदी उपस्थित होते.










