तेरवण मेढे श्री देव नागनाथ सातेरी भावई मंदिराची पाडव्याच्या शुभमुहुर्तावर झाली पायाभरणी

सढळ हाताने मदतीचे भक्तांना आवाहन
Edited by: संदीप देसाई
Published on: March 23, 2023 20:08 PM
views 338  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आणि भाविकांचे श्रद्धास्थान अशी ओळख असलेल्या तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिर जिर्णोद्धाराचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी गावकरी सज्ज झाले असून बुधवारी  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेकडो भाविकांच्या उपस्थित या मंदिर जीर्णोद्धारासाठी मोठ्या उत्साहात पायाभरणी करण्यात आली. यावेळी 'हर हर महादेव' जयघोष व ओम नम् शिवाय मंत्रजप करण्यात आला. पांडवकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या या मंदिरात स्वयंभू नागनाथ स्थान असल्याने संपूर्ण तालुका वसियांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिर जीर्णोद्धाराच्या शुभारंभप्रसंगी शेकडो भाविक उपस्थित होते. 


दोडामार्ग तालुक्यातील  तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ तीर्थ क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यातील भाविक महाशिवरात्रीला हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात. येथे महाशिरात्र उत्सव अमाप भक्तीमय वातारणात सपंन होतो. याठिकाणी असलेल्या नागनाथ मंदिर जुन्या मंदिराचे मुळ पांडवकालीन गाभारा जैसे थे ठेवत बाकी निर्लेखन केल्याने त्या  ठिकाणी नवीन मंदिर उभारण्याचा संकल्प तेरवण मेढे देवस्थान उपसमिती व गावकरी मंडळी यांनी गेल्या चार वर्षांपासून केला होता. पण थोडा विलंब होत होता, पण यावेळी महाशिवरात्री उत्सव झाला की मंदिराचा जीर्णोद्धार पायाभरणी शुभारंभ करावा असा निर्णय घेऊन मंदिराचा गाभारा सोडून मंदिराचा जुना भाग गावकरी यांनी बाजूला केला होता. 

अखेर ठरल्यानुसार बुधवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या नव्या मंदिराच्या उभाणीसाठी पायाभरणी समारंभ करण्याचे निश्चित करून या पायाभरणी समारंभ पूर्ण करण्यात आला. यावेळी  देवस्थानच्या निगडित असलेल्या मानकरी मंडळी, गावच्या सीमेवरील असलेली गावे इतर गावातील ग्रामस्थ व तेथील मानकरी तसेच काही सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांना या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी निमंत्रित करण्यात आले  होते. 

गावातील प्रमुख मानकरी, गावातील जेष्ठ ग्रामस्थ मंडळी तसेच परिसरात ग्रामस्थ व निमंत्रित मान्यवर यांच्या उपस्थितीत ब्राह्मण मंडळी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीवत कार्यक्रम पूर्ण करून पायाभरणी विधी पार पाडण्यात आला.  हा सोहळा पाहाण्यासाठी श्री देव नागनाथ चे शेकडो भाविक तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिरात दाखल झाले  होते. श्री देव नागनाथ श्री देवी सातेरी भावई, इतर देवता यांचे अवसारी रूपात आगमन होऊन पायाभरणी करण्यासाठी पूजन केलेली शिळा दगड उचलून पायाभरणी मुहूर्त केला जाणार होता त्या ठिकाणी ठेवून विधीवत पूजा अर्चा केली. या नंतर मंगलाष्टके म्हणून हर हर महादेव नामाचा जयघोष करण्यात आला. 

कित्येक वर्षे आखलेला संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आता श्री देव नागनाथ मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. तेरवण मेढे देवस्थान उपसमिती सर्व पदाधिकारी गावातील प्रमुख ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी व पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी तेरवण मेढे, इसापूर, मिरवेल, मोर्ले, केर भेकुर्ली, हेवाळे,  केंद्रे, विजघर, पाळये, सोनावल, तिराळी, कोनाळ, घोटगे, परमे, घोटगेवाडी, मांगेली, बोडदे, खोक्रल,  साटेली भेडशी, झरेबांबर, सरगवे, आयनोडे, कुडासे, कळणे, कसई दोडामार्ग, इतर गावातील निमंत्रित ग्रामस्थ तसेच काही सरपंच, उपसरपंच, राजकीय लोकप्रतिनिधी, उपस्थित होते. देवस्थान उपसमिती ग्रामस्थ यांच्या वतीने या पायाभरणी सोहळ्यास आलेल्या भाविकांना श्रीफळ देऊन स्वागत करणेत आले. 

तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ सातेरी भावई मंदिर पायाभरणी झाली असून आता प्रत्यक्ष कामाला  सुरुवात झाली आहे, तेव्हा दोडामार्ग तालुक्यातील तसेच  इतर भाविकांनी आपल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान उपसमिती तेरवण मेढे यांनी केले आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा पायाभरणी शुभारंभ पार पडला असून येत्या दोन वर्षात श्री देव नागनाथचे सुसज्ज मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी गावकरी, मानकरी मंडळी व स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती सज्ज झाली असून आता मंदिर कामांस प्रत्यक्ष सुरवात झाल्याने ज्या भक्तांना आपलं योगदान द्यायचं असेल त्यांना आवाहन करण्यात आलं आहे.