हल्ल्याचा कट, सखोल चौकशीची मागणी !

माजी नगरसेवकांनी वेधलं पोलिस निरीक्षकांचं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 10:11 AM
views 263  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवल्यान हल्ला करण्यासाठी रचलेल्या प्लानबाबत सखोल चौकशी करुन संबंधित हल्लेखोरांना जनतेच्या समोर आणावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवकांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली आहे. 


सावंतवाडी ते आंबोली घाटमार्ग रस्ता दुरुस्ती व नुतनीकरण या कामाबाबत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधी तक्रार करून त्यासंदर्भात चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर सबंधित भ्रष्टाचारात गुंतलेल्या ठेकेदार व सार्व. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला करुन दुखापत करण्याबाबत एकत्रित जमून प्राणघातक हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. सावंतवाडी येथील एक ठेकेदार यांच्या प्लांटवर सुमारे १० दिवसांपूर्वी जेवणावळ करुन त्या ठिकाणी प्राणघातक हल्ल्याचा कट शिजविण्यात आला असून माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर याच्यावर हल्ला करण्याबाबत प्रत्येकांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये काही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी या कार्यालयाचा एक अधिकारी यांनी हा प्राणघातक हल्ला करण्याचा प्लान तयार केला. सखोल चौकशी करुन संबंधित हल्लेखोरांना जनतेच्या समोर आणावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवकांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमाकांत वारंग, उमेश कोरगावकर, विलास जाधव, सुधीर पराडकर, विद्याधर गावडे आदी उपस्थित होते.