
वेंगुर्ले : तालुक्यातील मातोंड सुकाळेवाडी येथील बाळकृष्ण महादेव नेमण व विष्णू महादेव नेमण यांच्या मालकीच्या घराशेजारील मांगराला अचानक आग लागून सुमारे २ लाख २० हजारांचे नुकसान झाले. या आगीत संपूर्ण मांगर जाळून खाक झाला असून यात मंगरात असलेल्या एका गायीचा मृत्यू झाला तर २ गुरे होरपळून जखमी झाली आहेत. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज मंगळवारी (१४ मे) दुपारी १ वाजताच्या दरम्यान मंगराला ही आग लागली. या मंगरात मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड तसेच गवत असल्याने व मांगराचे छप्पर लाकडी असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. या मांगरात असलेल्या गुरांना विष्णू नेमण व ग्रामस्थांनी बाहेर काढले मात्र आत असलेल्या १ गाय, एक गाभण म्हैस व एक वासरू ८० ते ९० टक्के भाजले. यातील गायीचा काही वेळाने मृत्यू झाला. तर उर्वरित म्हैस व वासरू गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या मांगरात असलेला सुमारे ४० हजार किमतीचा १ पॉवर विडर, सुमारे ५० हजार किमतीची दरवाज्याची नवीन २ उबली, सुमारे १५ हजार किमतीचे जळाऊ लाकूड व गवत, गुरे, छप्पर व इतर वस्तू असे मिळून सुमारे २ लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे. आगीची बातमी समजताच घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, राहुल प्रभू, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण नेमण, ग्रामस्थ रणजित नेमण, राजन नेमण, माजी ग्रा प सदस्य सुविधा नेमण, अभि सावंत, महेश वडाचेपाटकर यांनी धाव घेतली. यानंतर तलाठी किरण गजनीकर, मातोंड ग्रामपंचायत सरपंच मयुरी वडाचेपाटकर, वीज वितरणचे अधिकारी श्री कोठावळे, लाईनमन अजित तळवणेकर, विठ्ठल जोशी, सत्यवान नाईक, पशु वैद्यकीय विभागाचे डॉ बी बी चव्हाण यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. दरम्यान हे नेमण कुटुंबीय अत्यंत गरीब असून या नुकसनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.